42 C
Gondiā
Friday, June 12, 2026
Home शैक्षणिक गंभीर आरोप सिद्ध झाल्याने मुख्याध्यापिका अजया चुटे यांची सेवेतून हकालपट्टी!

गंभीर आरोप सिद्ध झाल्याने मुख्याध्यापिका अजया चुटे यांची सेवेतून हकालपट्टी!

0
0

blank

श्री विद्या गर्ल्स हायस्कुलमधील खळबळजनक कारवाई

▪️*महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी नियमावलीनुसार चौकशी समितीच्या शिफारशीवर व्यवस्थापनाचा मोठा निर्णय*
▪️*१५ जून २०२६ पासून सेवामुक्तीचे आदेश लागू; गोंदिया जिल्हा शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ*

सालेकसा : तालुक्यातील साखरी टोला (सातगाव) येथील ‘श्री विद्या गर्ल्स हायस्कुल’च्या मुख्याध्यापिका श्रीमती अजया जागेश्वर चुटे यांच्यावर अखेर व्यवस्थापनाने बडतर्फीची मोठी कारवाई केली आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेले गंभीर आरोप चौकशी समितीसमोर सिद्ध झाल्याने, संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने त्यांना सेवेतून थेट बडतर्फ (सेवामुक्त) केले आहे. या धक्कादायक कारवाईमुळे गोंदिया जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
संस्थेकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, श्रीमती अजया चुटे यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने ‘महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१’ मधील नियम क्र. ३६ व ३७ अन्वये एक विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आपला अंतिम अहवाल व्यवस्थापनाकडे सादर केला होता. समितीने अहवालात मुख्याध्यापिकेवर असलेले गंभीर आरोप सिद्ध झाल्याचे नमूद करत शिक्षेची शिफारस केली होती. हा अहवाल आणि शिफारस व्यवस्थापनाने सर्वसंमतीने स्वीकारली असून त्यानुसार पारीत ठरावा अन्वये ही कठोर कारवाई करण्यात आली.
पारीत झालेल्या अंतिम निर्णयानुसार, श्री विद्या गर्ल्स हायस्कुल, सातगाव (साखरी टोला), ता. सालेकसा, जि. गोंदिया या शाळेच्या सेवेतून श्रीमती अजया जागेश्वर चुटे यांना दि. १५ जून २०२६ (माध्यान्हपूर्व) पासून अधिकृतपणे सेवामुक्त करण्यात आले आहे. १५ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या आधीपासूनच त्यांचे मुख्याध्यापिका पद आणि सेवेतील सर्व अधिकार संपुष्टात आले आहेत.
या संवेदनशील आणि मोठ्या प्रशासकीय कारवाईची अधिकृत प्रत (प्रतिलिपी) पुढील योग्य त्या प्रशासकीय कार्यवाहीसाठी माननीय शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद गोंदिया तसेच माननीय अधीक्षक, भविष्य निर्वाह निधी पथक, गोंदिया यांना तात्काळ रवाना करण्यात आली आहे. एका विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेवरच गंभीर आरोप सिद्ध होऊन थेट हकालपट्टी झाल्याने, सध्या हाच विषय संपूर्ण जिल्हाभरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.