नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावेत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

0
10

मुंबई, दि. 7 : स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांनी काळाच्या गरजेनुसार अभियांत्रिकी, कृषी आणि वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या समावेशासह विषयांची मांडणी करून, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमक्रम सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा. वैद्यकीय क्षेत्राचा विस्तार करणे महत्त्वाचे असून, संबंधित अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांच्या कायद्यातील तरतुदीत सुधारणा करण्यासंदर्भात शासन सकारात्मक विचार करेल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांच्या कायद्यातील तरतुदी बदलाबाबत, अग्रगण्य शैक्षणिक आणि संशोधन संघटनेच्या समस्यांबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंत्री श्री.पाटील बोलत होते. या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, अग्रगण्य शैक्षणिक आणि संशोधन संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोना काळानंतर वैद्यकीय क्षेत्र अधिक विस्तारण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकसंख्येनुसार वैद्यकीय यंत्रणा असणे गरजेचे असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या नवीन शिक्षणक्रमासह नवीन शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव संघटनेने सादर करावा. या प्रस्तावाबाबत उच्चस्तरीय बैठकीत शासनस्तरावर सकारात्मक विचार करण्यात येईल. याचबरोबर कृषी व अभियांत्रिकी या क्षेत्रातही नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठांच्या कायद्यातील तरतुदीत योग्य तो बदल करण्याचा विचार करण्यात येईल असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी स्वयं अर्थसहाय्यित विद्यापिठांच्या कायद्यातील तरतुदीत योग्य तो बदल करण्याचा विचार करण्यात येईल, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.