आयडॉलच्या जानेवारी सत्राच्या प्रवेशास आजपासून प्रारंभ

0
9

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या जानेवारी सत्राच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशास आजपासून दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजी सुरुवात झाली असून हे प्रवेश १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत असतील. विद्यार्थ्यांना जानेवारी ते डिसेंबर २०२३ च्या सत्रात प्रवेश घेऊन दूरस्थ माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण करता येईल. या जानेवारी सत्रामध्ये विद्यार्थी बीए, बीकॉम, एमए, एमकॉम व एमए शिक्षणशास्त्र या अभ्यासक्रमामध्ये हे प्रवेश घेऊ शकतील.

जे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना काही कारणामुळे जुलै सत्रात प्रवेश घेता आला नाही त्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची हि एक संधी आहे. अशा विद्यार्थ्यांनी आयडॉलमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी केले आहे.

यूजीसीची आयडॉलला जानेवारी २०२६ पर्यंत मान्यता

वर्ष २०२० मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने जुलै सत्राबरोबरच जानेवारी सत्रातही प्रवेश देण्याची अनुमती देण्यात आली. यानुसार वर्ष २०२२ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेलाही जानेवारी सत्राचे प्रवेश करण्यास मान्यता मिळाली. मुंबई विद्यापीठाला नॅकची ए ++ ग्रेड व ३.६५ गुण मिळाल्यामुळे यूजीसीने आयडॉलला जानेवारी २०२६ पर्यंत सलग पाच वर्षाची मान्यता दिली आहे.हि मान्यता २० अभ्यासक्रमासाठी देण्यात आलेली आहे.

सेमिस्टर पद्धतीमध्ये प्रवेश

आयडॉलमध्ये जुलै सत्रामध्ये सत्र पद्धतीस प्रारंभ झाला आहे. या जानेवारी सत्रामध्ये पदवीच्या प्रथम, व्दितीय व तृतीय वर्ष बीए व बीकॉम बरोबरच पदव्युत्तर प्रथम व व्दितीय वर्ष एमए व एमकॉम मध्येही सेमिस्टर पद्धत सुरु करण्यात आली आहे.एमए मध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी हे भाषा विषय असून मानव्य व सामाजिकशास्त्रामध्ये इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, व समाजशास्त्र हे विषयात प्रवेश घेता येईल. तसेच एमए शिक्षणशास्त्र हे अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. एमकॉम मध्येही अकाउंट्स व व्यवस्थापन असे दोन समूह विषय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. हे सर्व प्रवेश ऑनलाईन आहेत.

बी.ए मानसशास्त्र विषय सुरु

बी.ए मध्ये मानसशास्त्र विषयाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अनेक महाविद्यालयात तृतीय वर्षी बी. ए. मध्ये मानसशास्त्राचे सहा पेपर उपलब्ध नसल्याने विदयार्थी मानसशास्त्रापासून वंचित राहतात. यावर्षीपासून आयडॉलमध्ये मानसशास्त्राचे सहा पेपर सुरु करण्यात येत आहे.

विभागीय उपकेंद्रावर मार्गदर्शन व अध्ययन साहित्य वितरण

आयडॉलचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून याठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे.पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे.

विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning या संकेतस्थळावरून प्रवेश घ्यावा.