मुंबई-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी / मार्च-2024 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 12 वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून, तर 10 ची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे.
पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोकण, कोल्हापूर, अमरावती व नाशिक या 9 विभागीय मंडळामार्फत 10 वी व 12 वीची लेखी परीक्षा घेतली जाते. त्यानुसार, शिक्षण मंडळाने पुढील वर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात होणाऱ्या या इयत्तांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 12वीची (सर्वसाधारण, द्विलक्षी विषय व व्यवसाय अभ्यासक्रम) परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 दरम्यान होईल. तर 10 वीची परीक्षा 1 ते 22 मार्च 2024 दरम्यान आयोजित केली जाईल.
मंडळाच्या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक
मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर 10 वी-12 वीच्या परीक्षेचे संभाव्य सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी तथा विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी लेखी परीक्षेचे हे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
शाळांना मिळणारे छापील वेळापत्रक अंतिम
मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छापलेले किंवा व्हॉट्सअप किंवा तत्सम माध्यमांतून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहनही मंडळाकडून करण्यात आले आहे.
हरकती कळवण्यास 15 दिवसांचा अवधी
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्र्यपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल. या वेळापत्रकांसंबंधी काही सूचना व हरकती असल्यास त्या विभागीय मंडळासह राज्य मंडळाकडे 15 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. त्यानंतर आलेल्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असेही ओक यांनी या प्रकरणी स्पष्ट केले आहे.