गोंदिया, दि.20-: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देण्यात येतो. शैक्षणिक सत्र 2022-23 करीता विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी प्रणाली 22 सप्टेंबर 2022 पासून कार्यान्वित करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना महाडिबीटी प्रणालीवर अर्ज भरण्याकरिता (नविन/नुतनीकरण) 25 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. शैक्षणिक सत्र 2022-23 संपलेले आहे तरी सुध्दा सद्यस्थितीमध्ये 18 सप्टेंबर 2023 अखेर महाविद्यालयाचे आयडीवर खालील प्रमाणे शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज प्रलंबित आहेत.
अनु.जाती | इमाव | विजाभज | विमाप्र | एकूण | |
शिष्यवृत्ती | 301 | 573 | 84 | 90 | 1048 |
फ्रिशीप | 27 | 99 | 23 | 13 | 162 |
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृती | 45 | – | 23 | 68 |
जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना महाविद्यालयाच्या आयडीवर प्रलंबित असलेले अर्ज त्रुटी पुर्तता करुन समाजकल्याण कार्यालयाचे आयडीवर सादर करण्याबाबत कार्यालयामार्फत कार्यालयीन पत्राद्वारे, कार्यालयातील तालुका लिपीक यांचे मार्फत भ्रमणध्वणीद्वारे संपर्क साधुन तसेच व्ही.सी. व प्रत्यक्ष सभेमध्ये सुध्दा वारंवार सुचना देण्यात आलेल्या आहेत, तरी वरील प्रमाणे महाविद्यालयाचे आयडीवर अर्ज प्रलंबित आहेत.
महाविद्यालयामध्ये प्रवेशित शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जातील त्रुटींची पुर्तता विद्यार्थ्यांकडुन करुन घेणे ही महाविद्यालयाच्या प्राचार्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा अर्ज भरलेला नाही त्यांनी त्वरित शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज भरावा. ज्या महाविद्यालयाचे आयडीवर शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पुर्तते अभावी प्रलंबित आहेत त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज तपासून, अर्जातील त्रुटींची पुर्तता करुन पात्र अर्ज दिनांक 25 सप्टेंबर 2023 पर्यंत समाज कल्याण कार्यालयाचे आयडीवर सादर करावे. विहीत वेळेत शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पुर्तता करुन समाज कल्याण कार्यालयाचे आयडीवर सादर न केल्यामुळे शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीस वंचित राहिल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही.
करिता विहित मुदतीत शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी पुर्तता करुन समाज कल्याण कार्यालयाचे आयडीवर सादर करावे. विलंब/टाळाटाळ झाल्यामुळे शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहिल. तरी जिल्ह्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.