मुंबई, दि. 20: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार केलेल्या विशेष बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरु डॉ. पराग काळकर, अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यासह विद्यापीठाचे सदस्य, कुलसचिव उपस्थित होते.
बोधचिन्हासाठी विद्यापीठातर्फे स्पर्धा घेण्यात आली होती. २०० प्रवेशिकांमधून अनुराग साळुंके यांनी तयार केलेल्या बोधचिन्हासाठी निवड करण्यात आली. त्याला ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते श्री. साळुंके यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
१० फेब्रुवारी २०२४ ते १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत वर्षभर विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, डॉ.नितीन घोरपडे, धोंडीराम पवार, संदीप पालवे, सिनेट सदस्य सर्वश्री सचिन गोर्डे, अशोक सावंत, विजय सोनवणे आदी उपस्थित होते.