राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ संपन्न

0
3

पुणे, दि. 17: भारताला 2047 पर्यंत विकसनशील राष्ट्रातून विकसित राष्ट्र बनविण्याची क्षमता युवकांमध्ये असून एक काळ असा येईल की परदेशात अधिक चांगल्या संधींसाठी स्थलांतरित झालेली येथील बुद्धीवान युवा पिढी पुन्हा भारताकडे स्थलांतर करील, असा विश्वास राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला.

चऱ्होली बु. येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या आठव्या पदवीदान समारंभात राज्यपाल श्री. बैस बोलत होते. विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू हृदयेश देशपांडे, अजिंक्य डी. वाय. पाटील समूहाच्या चेअरपर्सन श्रीमती पूजा पाटील, विविध विद्याशाखांचे अधीष्ठाता, विभागप्रमुख आदी याप्रसंगी उपस्थित होते.

देशाच्या राजकीय आणि आर्थिक स्थिरतेसाठी देशात  सर्वसमावेशक विकास होणे गरजेचे आहे, असे सांगून राज्यपाल श्री. बैस म्हणाले, देशात 50 टक्के भारतीयांना कृषी क्षेत्र रोजगार प्रदान करत असताना कृषी, पशुवैद्यकशास्त्र, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन तसेच फलोत्पादन क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाने काही गावांना दत्तक घ्यावे आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने त्यांचा विकास करावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

विविध विद्याशाखांमध्ये अग्रक्रम मिळविलेल्या, पदकप्राप्त तसेच पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन राज्यपाल पुढे म्हणाले, विकसित भारताच्या अनुषंगाने युवकांनी आपल्या कल्पना मांडाव्यात. चांद्रयान मिशन, सूर्य मिशन, आशियाई आणि इतर क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे यश यामुळे भारतीयांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांच्यामध्ये कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्याची भावना निर्माण झाली आहे. हीच भावना युवकांनी आपल्या हृदयात ठेवावी आणि संपत्तीचे निर्माते आणि स्टार्टअप्सचे प्रवर्तक व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांनी नवोन्मेषक आणि जोखीम घेणारे उद्योजक बनावे. आता भारतानेही स्वतःचे नवीन उद्योजक निर्माण करण्याची वेळ आली असून आपले व्यवस्थापन पदवीधर, अभियंते, शास्त्रज्ञ त्यांच्या स्वत: च्या जागतिक दर्जाच्या कंपन्या, सल्लागार कंपन्या तयार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यपाल पुढे म्हणाले, जगातील अनेक देशांनी वेगवेगळ्या काळात विकसित राष्ट्र बनण्यासाठी मोठी झेप घेतली आहे. प्रतिकूल परिस्थितीतून तसेच आपत्तींना तोंड देत अनेक देश विविध क्षेत्रात आघाडीवर आले आहेत. जगातील अनेक देश व्यापार आणि गुंतवणुकीसाठी चीनला मोठा पर्याय शोधत असताना त्याचा लाभ भारताला होऊ शकतो. त्यासाठी आपण आपल्या तरुणांना कौशल्य प्रशिक्षीत, पुन: प्रशिक्षीत आणि त्यांची कौशल्यवृद्धी कशी करतो यावर हे अवलंबून आहे, असेही ते म्हणाले.

कुलगुरू श्री. देशपांडे यांनी यांनी स्वागत आणि विद्यापीठ अहवाल सादर केला. या पदवीप्रदान सोहळ्यात 847 स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी, डॉक्टरेट प्रदान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपाल श्री. बैस यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शिक्षण तज्ज्ञ भरत अमलकर, सर्वोच्च न्यायालयातील अभियोक्ता जे. साई दीपक, रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ ग्रेट ब्रिटनचे अध्यक्ष रॉबर्ट वॉल्टन, संरक्षण मंत्रालयाचे प्रधान सल्लागार ले. जन.विनोद खंदारे (निवृत्त), चित्रपट निर्माता विवेक रंजन अग्निहोत्री यांना मानक डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. याप्रसंगी जे. साई दीपक आणि विवेक रंजन अग्निहोत्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते विद्यापीठातील विविध विद्याशाखात अग्रस्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत आणि कांस्य पदके, पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.