राज्यपाल रमेश बैस यांची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शाळेला भेट

0
2
वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुणे दि.१७: राज्यपाल रमेश बैस यांनी पुणे महानगरपालिकेच्या औंध येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे आणि संवाद कौशल्याचे त्यांनी कौतुक केले. शालेय अभ्यासक्रमासोबत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा बुध्यांक वाढण्यास मदत होते, असे राज्यपाल म्हणाले.

यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे, तहसीलदार राधिका बारटक्के, शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, मुख्याध्यापिका कीर्ती सावरमठ, गोमती स्वामिनाथन, सुलभा मेमाणे आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.बैस यांनी शाळेतील विविध वर्गांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी राज्यपाल महोदयांना शाळेतील बहुकौशल्य अभ्यासक्रम, करिअर मार्गदर्शन, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती, स्वच्छता उपक्रम, आर्थिक साक्षरता आदी उपक्रमांची माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लाठी काठी प्रात्यक्षिक, कराटे आणि छत्तीसगढच्या पारंपरिक नृत्याचे राज्यपालांनी कौतुक केले. लहान बालिकांनी सादर केलेल्या नृत्यानंतर त्यांनी विद्यार्थिनींची कौतुक करताना उत्स्फूर्तपणे नृत्य पथकात जाऊन विद्यार्थिनींसोबत छायाचित्र घेतले. अधिक मार्गदर्शन मिळाल्यास या विद्यार्थिनी उत्तम कला सादर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या टिकाऊ वस्तूंच्या दालनालादेखील श्री.बैस यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांच्या कलेचे आणि इंग्रजीतून संभाषण करण्याच्या कौशल्याचे त्यांनी कौतुक केले.


0000