
**ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनची मागणी
मोहाडी- तालुक्यातील भीमाताई कॉन्व्हेंट मोहाडी येथे ज्युनियर कॉलेज असून सदर कनिष्ठ महाविद्यालय पूर्णता शून्य हजेरी पटावर(Zero attendance) सुरू आहे. सदर महाविद्यालयात कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा नाही व पात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ही नाहीत. तरी अशा शिक्षणाचा गोरखधंदा करणाऱ्या बोगस कनिष्ठ महाविद्यालयावर कायदेशीर कारवाई करून महाविद्यालयाची मान्यता रद्द करून संस्थेवर व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन भंडारा जिल्हा कौन्सिल च्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे शिक्षणाधिकारी(माध्यमिक) श्री. सलामे, शिक्षण सभापती,शिक्षण उपसंचालक, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
मोहाडी तालुक्यातील भीमाताई कॉन्व्हेंट मोहाडी येथे ज्युनियर कॉलेज असून कला ,वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात. सदर कनिष्ठ महाविद्यालय पूर्णता शून्य हजेरी पटावर(Zero attendance) सुरू आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, मात्र ते सर्व विद्यार्थी महाविद्यालयात नियमित येत नाही. सर्व विद्यार्थी भंडारा-नागपूर सारख्या शहरांमध्ये खाजगी शिकवणी वर्गांमध्ये शिकतात. येथील विद्यार्थी वर्षभर महाविद्यालयात येत नाही, मात्र त्यांची वर्षभराची हजेरी महाविद्यालय प्रशासनाकडून लावली जाते. अशा प्रकारे येथील सर्व विद्यार्थी बाहेर खाजगी शिकवणी वर्गामध्ये शिकतात व महाविद्यालयात येत नाहीत ते फक्त कागदोपत्री सदर कनिष्ठ महाविद्यालयात आहेत.
सदर महाविद्यालय पूर्णपणे शून्य हजेरीपट तत्त्वावर चालत असून अशा खाजगी संस्थांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन ते मागे पडत आहेत व जिल्हा परिषदेच्या शाळाही ओश पडत आहेत. शाळेत जाणारा विद्यार्थी शिक्षणाच्या खाजगीकरण व बाजारीकरणाच्या धोरणामुळे मागे पडत आहे.खाजगी शिकवणी वर्गामध्ये जाणारा विद्यार्थी पुढे जात आहे. जर बोर्डाचे नियमानुसार 75 टक्के हजेरी असणाऱ्या विद्यार्थ्यालाच परीक्षेला बसता येत असेल व समाज कल्याण विभागाच्या नियमानुसार 75 टक्के हजेरी असलेल्या विद्यार्थ्यालाच शिष्यवृत्ती मिळत असेल तर मग अशा शून्य हजेरीवाल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ कसा मिळतो व कोणाच्या आशीर्वादाने मिळतो? असा प्रश्न निर्माण होतो. यासोबतच सदर महाविद्यालयात कोणत्याही प्रकारचे भौतिक व इतर सुविधा उपलब्ध नाहीत, यामध्ये महाविद्यालयाची प्रशस्त इमारत नसून त्या ठिकाणी वर्गखोल्यांचा अभाव आहे व फक्त लहान मुलांसाठीच कॉन्व्हेंट सुरू आहे,प्रयोगशाळा, ग्रंथालय,खेळाचे मैदान, मुबलक पाणी व शौचालय इत्यादी सुविधांच्या अभाव आहे,महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नाहीत फक्त कागदोपत्री आहेत,विद्यार्थ्यांकडून प्रति विद्यार्थी 25 ते 30 हजार रुपये घेतले जातात.
अशाप्रकारे सदर महाविद्यालयात शिक्षणाचा गोरखधंदा सुरू आहे. या शून्य हजेरीपट व खाजगी शिकवणी वर्ग संस्कृतीचा ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन तत्वतः विरोध करते व अशा शाळांवर कठोर कारवाईची मागणी करीत काही मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत यामध्ये तसदर महाविद्यालय प्रशासनावर कायदेशीर कारवाई करून महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात यावी व विद्यार्थ्यांचे इतर जि.प. च्या शाळेत समायोजन करण्यात यावे, या प्रकरणात सहभागी असलेल्या संपूर्ण महाविद्यालय प्रशासनावर फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात यावा, ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या महाविद्यालयात आपले कागदपत्रे दिली व वास्तवात काम करत नाहीत त्यांच्यावरही शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद करण्यात यावे, सदर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ज्या शासनाच्या योजनांच्या लाभ घेतला त्या सर्व पैशांची रिकव्हरी संस्थेकडून करण्यात यावी, अशा बोगस संस्थांना बळ देणारे अधिकारी व शाळा तपासणीसाठी याआधी गेलेले अधिकारी ज्यांनी लाच घेऊन तपासणीच्या खोटा अहवाल सादर केला त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी.तसेच समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या त्या सर्व लाचखोर अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी.
वरील मागण्या गांभीर्याने घेऊन येत्या एक आठवड्यात पूर्ण करावे,अन्यथा आठवड्याभरानंतर ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन(AISF) जिल्हा परिषद कार्यलयासमोर प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आले.यावेळी शिष्टमंडळामध्ये जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड रवी बावणे यांच्यासह मोहाडी तालुकाध्यक्ष कॉ. विश्वजित बनकर, सरगम गोमासे, कल्याणी बडवाईक, वैष्णवी भोयर इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.