यंत्रणांनी यात्रेच्या ठिकाणी आवश्यक सोयी-सुविधा निर्माण कराव्या- विजया बनकर

0
7

प्रतापगड यात्रा आढावा

7 ते 13 मार्च दरम्यान यात्रेचे आयोजन

    गोंदिया, दि.22 : पूर्व विदर्भातील हिंदू-मुस्लीम बाधवांच्या एकात्मतेचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रतापगडची यात्रा प्रसिद्ध आहे. जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते. या ठिकाणी लाखो भाविक हर हर महादेव म्हणत भगवान भोलेबाबाचे दर्शन घेतात. नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी संबंधित यंत्रणांनी यात्रेच्या ठिकाणी आवश्यक त्या सोयी-सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी दिल्या.

         अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे दिनांक 7 मार्च ते 13 मार्च 2024 दरम्यान यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या निमित्ताने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात यात्रेबाबत पुर्वतयारी आढावा घेण्यात आला, त्यावेळी श्रीमती बनकर बोलत होत्या. जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) गोविंद खामकर, उपविभागीय अधिकारी अर्जुनी/मोरगाव वरुणकुमार सहारे, तहसिलदार अनिरुध्द कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, गटविकास अधिकारी विलास निमजे, प्रतापगड सरपंच भोजराम लोगडे यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

          विजया बनकर म्हणाल्या, यात्रेदरम्यान प्रत्येक विभागाने आपसात समन्वय ठेवून काम करावे. यात्रेत साधारणत: 5 ते 10 लाख भाविक समाविष्‍ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही कामात हयगय होणार नाही याची दक्षता घ्यावी. मानवीय दृष्टीकोनातून भाविकांना योग्य ती मदत करण्यात यावी. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात यावा. यात्रेच्या ठिकाणी लाईट जाणार नाही तसेच लोडशेडींग होणार नाही याची विद्युत महामंडळाने दखल घ्यावी. पोलीस व आरटीओ विभागाने पार्कींगची व्यवस्था सुनिश्चित करावी. एखाद्या प्रसंगी काही गडबड झाली तर ॲम्ब्युलन्स व अग्नीशमन वाहने आतमध्ये जाण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात यावी. यात्रेच्या ठिकाणी दुकाने लावतांना प्रत्येक पाच दुकानांमध्ये 10 फुटाचे अंतर ठेवावे. नगरपंचायत विभागाने अग्नीशमनची व्यवस्था करावी. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेटींग व सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे. भाविकांना यात्रेच्या ठिकाणी जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या आगार प्रमुखांनी पुरेशा बसेसची व्यवस्था करुन बसेसचे वेळापत्रक डिस्पले करावे. जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन क्लोरिनेशन करण्यात यावे.

         उन्हाळ्याला सुरुवात झालेली असल्यामुळे पिण्याचे शुध्द पाणी भाविकांना मिळेल याची योग्य ती दखल घ्यावी. पिण्याच्या पाण्याचे जे स्त्रोत उपलब्ध आहेत त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. आरोग्य विभागाने भाविकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्धतेसाठी आरोग्य शिबिराचे कॅम्प लावावे. औषधीसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन ठेवावा. यात्रेस्थळी फॉगींग करण्यात यावे. यात्रेदरम्यान तात्पुरते शौचालय/मोबाईल टॉयलेट व इतर अनुषंगीक सुविधा, आंघोळीची व स्वच्छतेची व्यवस्था तसेच आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करुन ठेवावे. खाद्य पदार्थ विक्रीच्या दुकानांची तपासणी करुन विषबाधेसारखे प्रकार होणार नाही याची अन्न व औषध प्रशासन विभागाने दखल घेवून आवश्कतेनुसार भरारी पथक नियुक्त करावे. ‘नो सेल्फी झोन’ दर्शनीय ठिकाणी बॅरिकेटींग करण्यात यावे. अपघात प्रवण स्थळ दर्शविण्याची व्यवस्था आरटीओ व पोलीस विभागाने करावी. वाहतुकीची कोंडी होणार नाही याकडे पोलीस विभागाने विशेष लक्ष्य द्यावे. यात्रेदरम्यान भाविकांनी पॉलिथिनचा वापर करु नये. यात्रेस्थळी मोबाईल कनेक्टिव्हीटीची समस्या असल्यामुळे सदर ठिकाणी वॉकीटॉकीचा उपयोग करावा. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस कंट्रोल रुम तयार करण्यात यावे. सदर सभेत उपस्थित झालेल्या मुद्याच्या अनुषंगाने पुढील बैठकीस येतांना अनुपालन अहवाल सादर करावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी संबंधित विभागाला दिल्या.