सर्व शिक्षकांना आता ड्रेसकोड अनिवार्य-शिक्षणमंत्री केसरकर यांची घोषणा

0
84

डॉ. प्रमाणे शिक्षकांच्या नावासमोर टीआर. लागणार
मुंबई : शिक्षक हे भावी पिढी घडवत असतात. तसेच, जनमानसात त्यांच्याकडे गुरु म्हणून पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत असतो. ही बाब विचारात घेता, राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा, याबाबत शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता तसेच पुरूष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पँट परिधान करावी. जीन्स टी शर्ट चालणार नाही किंबहुना चित्रविचित्र नक्षीकाम असलेले शर्ट नको, असे शालेय शिक्षण विभागाने बजावले आहे.
विद्यार्थ्यांना जसा गणवेश अनिवार्य असतो त्याचप्रमाणे आता राज्यातील सर्व शिक्षकांनाही ड्रेसकोड असणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. याशिवाय सर्व शिक्षकांना आता त्यांच्या नावापुढे टीआर म्हणजे शिक्षक अशी पदवी लावता येणार आहे, जसे डॉक्टरांना डॉ. लावता येते. तसा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आला आहे. शिक्षकांचे समायोजन करताना नव्या नियमांची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.