देवरी येथे भारतीय संविधान जनजागृती अभियान

0
6
वाढदिवसाच्या शुभेच्छा

देवरी, दि. २१- स्थानिक मनोहरभाई पटेल महविद्यालय आणि नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान जनजागृती अभियानाचे आयोजन गेल्या  गुरूवारी (दि. १४) करण्यात आले होते.

स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण झिंगरे हे होते. याप्रसंगी सकाळी १० ते दुपारी चार या दरम्यान दोन सत्रात व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व्याख्यान मालेचे शुभारंभ करण्यात आले.

प्रास्ताविक  प्रा. सुनीता रंगारी यांनी केले. पहिल्या सत्रातील व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ चंद्रमणी गजभिये यांनी गुंफले. ‘संविधानातील मूलभूत अधिकार’ या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले. व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प प्रा.डॉ.जयपाल चव्हाण यांनी गुंफले. त्यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती व वैशिष्ट्ये या विषयावर सविस्तर भाष्य केले. व्याखानमालेचे तिसरे पुष्प डॉ.प्रा.डॉ.वर्षा गंगणे यांनी गुंफत संविधानातील महत्वपूर्ण विषयावर भाष्य केले. आपले संविधान आणि आर्थिक विकास या विषयावर भाष्य करीत आजच्या आर्थिक विकासाशी तुलना करीत व दाखले देत ,संविधानाचे महत्व विशद केले.
पहिल्या सत्रात प्राचार्य डॉ.अरुण झिंगरे यांच्या अध्यक्षतेखाली सलग तीन अभ्यासपूर्ण व्याख्याने झालीत.
व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात डॉ.प्रा.देवेन्द्र बिसेन यांनी संविधानाचे महत्व व उपयुक्तता या विषयावर भाष्य केले. दुपारच्या दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. अरुण झिंगरे यांनी अध्यक्षीय भाषण केले. संविधानातील हक्क आणि अधिकार व त्यांचे पालन या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण भाषण केले.
दोन्ही सत्रांचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. भास्कर डोंगरे यांनी केले. उपस्थितांचे आभार पूर्वेश उके या विद्यार्थ्याने मानले. या व्याख्यानमालेला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.