Home शैक्षणिक ‘शाळापूर्व तयारी अभियान’ जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

‘शाळापूर्व तयारी अभियान’ जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

0

स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता १ ली दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानाची अंमलबजावणी होणार

वाशिम,दि.१७ – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत मागील वर्षी एप्रिल २३ ते जून २३ या कालावधीत इयत्ता १ ली दाखलपात्र बालकांसाठी “शाळापूर्व तयारी अभियान” अंतर्गत “पहिले पाऊल” हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात आला आहे. त्यानुसार स्टार्स (STARS) प्रकल्पांतर्गत सन २०२४ -२५ या शैक्षणिक सत्रातही इयत्ता १ ली दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानाची अंमलबजावणी करण्याकरिता १० एप्रिल रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम येथे शाळापूर्व तयारी अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेत प्रथम सत्रात अधिव्याख्याता विलास कडाळे यांनी शाळापूर्व तयारी अभियान संकल्पना व स्वरूप, शाळापूर्व तयारी अभियान मेळावा कोणत्या बालकासाठी व का घ्यावा, कोणत्या कालावधीमध्ये घ्यावा, मेळावा घेण्याकरिता जनजागृती कशाप्रकारे करावी, याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही व अंमलबजावणी तसेच शाळापूर्व तयारी अभियान मेळाव्यासाठी मेळावा पूर्वतयारी, प्रत्यक्ष मेळावा क्र. १ चे आयोजन करणे, मेळावा क्र. २ पर्यत दरम्यानच्या कालावधीत इयत्ता १ ली दाखलपात्र असलेल्या मुलांचे पालक/माता यांनी शाळेतील पहिले पाऊल या पुस्तिकेच्या आधारे तसेच मेळावा व साप्ताहिक बैठकीतील मार्गदर्शनानुसार मुलांकडून तयारी करून घेणे हे तीन महत्वाचे टप्पे आहेत याबाबत माहिती दिली.व
 शाळापूर्व तयारी अभियान कार्यशाळेचे आयोजन तालुकास्तरावर, केंद्रस्तरावर करण्यासंबंधी सांगितले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिमचे प्राचार्य भा. भ. पुटवाड यांनी शाळापूर्व तयारी अभियान अंमलबजावणी मध्ये शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद वाशिम, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व, प्रशासन अधिकारी, न. प., शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका या सर्व पर्यवेक्षिय यंत्रणेची काय भूमिका आहे, व ती भूमिका त्यांनी कशाप्रकारे पार पाडावी याबाबत मार्गदर्शन केले.
 शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांनी “शाळापूर्व तयारी अभियान” मेळावा पर्यवेक्षीय यंत्रणेची जबाबदारी, मेळावे दर्जेदार व उल्लेखनीय करण्याकरिता प्रयत्नशील असणे महत्वाचे आहे. गाव स्तरावर अंगणवाडी सेविका, शिक्षण विभागातर्गत यंत्रणा यांचा समन्वय असणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष पालक/माता गटांना भेटी देऊन त्यांचे समुपदेशन करावे. “शाळापूर्व तयारी अभियान” करिता केलेले काम हे विविध लिंकच्या माध्यमातून तथा सांख्यिकीय स्वरुपात दिसायला हवे याकरिता वेबपोर्टलचा वापर करावा, याबाबत मार्गदर्शन केले.
श्रीमती स्वाती ढोबळे विषय साधन व्यक्ती यांनी मेळावा क्र. १ चे प्रत्यक्ष आयोजन करून त्याकरिता ७ स्टाल्स लावले त्यामध्ये नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपूर्व तयारी, पालकांना मार्गदर्शन यानुसार सर्व स्टाल्सवर बालकांच्या कृतीच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार रकान्यात कशाप्रकारे कराव्या याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
सदर कार्यशाळेकरिता समग्र शिक्षा कार्यक्रम अधिकारी मंगेश गवई व प्रथम संस्था प्रतिनिधी शुभम देशमुख उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अधिव्याख्याता शिवशंकर मोरे ,जिल्हा समन्वयक स्मिता इंगळे,संजीवनी दारोकार, विशेष शिक्षक रुपाली सहारे आदींचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेमध्ये तालुकास्तरीय केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका व विषय साधन व्यक्ती उपस्थित होते.

Exit mobile version