Home विदर्भ लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी प्रजित नायर

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी प्रजित नायर

0
  • निवडणूक प्रचाराची वेळ आजपासून समाप्त

         गोंदिया, दि.17 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. सदर निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले.

        लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपविभागीय अधिकारी कार्यालय गोंदिया येथील सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी निवडणूक प्रक्रियेची माहिती देतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

        जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 17 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी    6 वाजता पासून उमेदवारांच्या प्रचाराची वेळ समाप्त होत असून आदर्श आचारसंहिता अंतर्गत लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 126 अंतर्गत जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आली असून मतदानाच्या दिवसापासून 48 तास पूर्व कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणूक प्रचार करणार येणार नाही. जिल्ह्यात एकूण 10 लाख 92 हजार 546 मतदार आहेत. यामध्ये 5 लाख 41 हजार 272 पुरुष मतदार आहेत तर 5 लाख 51 हजार 264 स्त्री मतदार असून इतर 10 मतदार आहेत. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात एकूण 401 मतदारांनी गृह मतदान केले असून निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट असलेले 4 हजार 467 मतदारांनी पोस्टल बॅलेट मतदान केले आहे. जिल्ह्यात एकूण 1288 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार व 85 वर्ष अधिक वयोगटातील मतदारांकरीता मतदान केंद्रावर आवश्यक त्या सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून 723 व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील 644 मतदान केंद्रावर वेब-कास्टींग संच लावण्यात आले असून विधानसभा मतदारसंघ स्तरावर व जिल्हास्तरावर कंट्रोल रुमची स्थापना करण्यात आली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उष्णतेची तीव्रता लक्षात घेता उष्माघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आरोग्य विभागामार्फत मेडिकल कीटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान केंद्रावर 5 हजार 716 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर निवडणुकीत नियुक्त मतदान पथकांना मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी व परत आणण्याकरीता 181 बसेस व 241 जिपची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 63-अर्जुनी मोरगाव व 66-आमगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सकाळी 7 वाजेपासून ते दुपारी 3 वाजतापर्यंत राहणार असून 64-तिरोडा व 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत राहणार आहे असे त्यांनी सांगितले.

          निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दिनांक 17, 18 व 19 एप्रिल रोजी ड्राय डे म्हणून पाळण्यात यावा. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंध करण्यात आले आहे. कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्रावर मोबाईल सोबत बाळगता येणार आहे. रात्री 10 वाजेनंतर स्पीकर वाजविण्यावर बंदी असणार आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रकारची अफवा पसरवू नये. सुजान नागरिकांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले.

Exit mobile version