अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून
- जिल्ह्यातील शासकीय व खासगी तंत्रनिकेतनमध्ये९६० जागा
- अंतिम गुणवत्ता यादी२ जुलै रोजी प्रसिद्ध होणार
- प्रवेश क्षमतेच्या७० टक्के जागा गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता राखीव
गोंदिया, दि.30 : राज्य तंत्र शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीत होणाऱ्या तंत्रनिकेतन अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील शासकीय व खासगी तंत्रनिकेतनमध्ये ९६० जागा भरावयाच्या असून विद्यार्थ्यांनी २५ जून २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन गोंदियाचे प्राचार्य सी.डी.गोळघाटे यांनी केले आहे. विशेष म्हणजे गोंदिया तंत्रनिकेतन संस्था ही डिजिटल क्लासरूम असलेली एकमेव संस्था असून या संस्थेत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण घेता येणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात चार पॉलिटेक्निक डिप्लोमा संस्था आहेत. शासकीय पॉलिटेक्निक गोंदिया-360 जागा, श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक आमगाव-180 जागा, सी.एस.इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी देवरी-180 जागा व गुरुकुल पॉलिटेक्निक नागरा-240 जागा अशी येथील प्रवेश क्षमता आहे.
गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गोंदिया ही महाराष्ट्र/भारतातील उदयोन्मुख पॉलिटेक्निक संस्थांपैकी एक असून जुलै 2009 मध्ये स्थापन झाली आहे. सध्या या संस्थेची वार्षिक प्रवेश क्षमता 360 आहे. या प्रमुख संस्थेचा परिसर 14.35 एकर जमिनीवर पसरलेला आहे आणि चांगल्या पायाभूत सुविधा आणि नविन सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक केंद्र, सेमिनार हॉल, ऑडिओ-व्हिडियो कक्ष, क्रीडा आणि खेळ सुविधा आहे. कॅम्पसमध्ये 180 मुले, 140 मुली स्वतंत्र वसतिगृहे आहेत आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय आहे. संस्था दर्जेदार शिक्षणाकडे वाटचाल करीत आहे, म्हणजेच विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सेवा देत आहे.
संस्थेच्या सहा शाखेत प्रत्येकी ६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. यात यंत्र अभियांत्रिकी 60 जागा, संगणक अभियांत्रिकी-60 जागा, माहिती तंत्रज्ञान-60 जागा, अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी- 60 जागा, विद्युत अभियांत्रिकी- 60 जागा व स्थापत्य अभियांत्रिकी-60 जागांचा समावेश आहे. त्यापैकी यंत्र अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी असे चार शाखेला राष्ट्रीय मान्यता मंडळ (National Board of Accreditation), ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (AICTE) नवी दिल्ली यांच्यातर्फे शिक्षणाच्या उच्च दर्जा प्रमाणपत्र प्राप्त आहे. एकूण प्रवेश क्षमतेच्या ७० टक्के जागा हे गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता व ३० टक्के जागा इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता राखीव असतात.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई तर्फे संस्थेच्या १०० टक्के विभागांना अतिउत्कृष्ट मानांकन असलेली गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे. प्लेसमेंटची संख्या सातत्याने वाढत असून विद्यार्थ्यांना विविध जागतिक कंपनीमध्ये रोजगार मिळाले. सर्व विभाग अद्ययावत साहित्यांनी सुसज्ज आहेत. उच्च प्रशिक्षित अध्यापक वृंद आहेत.
पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेसाठी शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया आणि जिल्ह्यातल्या इतर तंत्रनिकेतन येथे प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत. ऑनलाइन पद्धतीमध्ये E-Scrutiny, Physical Scrutiny असे दोन पर्याय आहेत. फार्म भरण्यासाठी मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी मुदत २५ जून २०२४ असून तात्पुरती गुणवत्ता यादी २७ जून २०२४ रोजी प्रसिद्ध होणार आहे. तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदविण्यासाठीची मुदत ३० जून २०२४ पर्यंत असणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी २ जुलै २०२४ रोजी https://poly24.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
महत्वाची सूचना : 1) CAP जागांच्या अंतर्गत प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या सर्व प्रकारच्या उमेदवारांनी नोंदणी करावी, कागदपत्रांची पडताळणी करावी आणि अर्जाची पुष्टी ई-स्क्रुटीनी मोड किंवा फिजिकल स्क्रूटीनी मोडद्वारे करावी. अशा पात्र नोंदणीकृत उमेदवारांचा CAP मेरिट आणि CAP द्वारे प्रवेशासाठी विचार केला जाईल. 2) संस्थात्मक कोट्यासाठी प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार, CAP नंतर रिक्त राहिलेल्या जागा, नोंदणी करणे, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जाची पुष्टी E-Scrutiny mode किंवा Physical Scrutiny mode द्वारे करणे अनिवार्य आहे. अशा उमेदवारांनी प्रवेशासाठी स्वतंत्रपणे संस्थांमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांची गुणवत्ता संस्था स्तरावर संस्थेद्वारे तयार केली जाईल.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे : दहावीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, अनुसुचित जाती/अनुसूचीत जमाती व्यतिरिक्त उर्वरित सर्व मागासवर्गीय उमेदवारंसाठी Non-Creamy Layer प्रमाणपत्र (३१ मार्च २०२५ पर्यंत वैध), राष्ट्रीय व अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी (EWS) प्रमाणपत्र, दिव्यांग बाबतचे प्रमाणपत्र, सैन्यदलातील संवर्गातून प्रवेशासाठी माहिती पुस्तिकेत दिलेले सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमीत केलेले प्रमाणपत्र,अल्पसंख्यकांसाठी प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र, आधार क्रमांक व संलग्न बँक खाते (Scholarship and Other Schemes).