ग्रामीण-दूर्गम-आदिवासी बहुल भागात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जागर

0
21
वाढदिवसाच्या शुभेच्छा

जव्हार-वाडा-मोखाडा येथील विद्यार्थ्यांसह स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि. १५ जूनः ग्रामीण, दूर्गम आणि आदिवासी बहुल भागात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अपेक्षित उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी मुंबई विद्यापीठ पुढे सरसावले आहे. आदिवासी बहुल भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, आव्हाने, मर्यादीत संसाधने, उपलब्ध दळणवळणाची साधने आणि कमी सकल नोंदणीचे प्रमाण अशा विविध अनुषंगिक बाबींवर मात करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नुकतेच विद्यापीठामार्फत पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातल्या जव्हार येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला पालघर जिल्ह्यातील सुमारे विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थाप्रमुख, शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी, एनजीओ, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर आणि स्थानिकांचा या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या कार्यशाळेला प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रा. कविता लघाटे, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. रविकांत सांगुर्डे, इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. शिवाजी सरगर यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केले.

एकवीसाव्या शतकातील आवश्यक प्रमुख कौशल्ये, अनुभवाधारीत शिक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सात्मक विचार रुजवून त्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाद्वारे नियोजन करण्यात आले असून त्या दिशेने पावले टाकली जात असल्याचे प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रात शहरी, ग्रामीण, दुर्गम आणि आदीवासी बहुल अशा भागांतील महाविद्यालयांचा समावेश होत असून जव्हार सारख्या दुर्गम भागातील उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीला अनुसरून कौशल्याधारीत आणि अधिक समग्र अभ्यासक्रमांची जोड देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. मुंबई विद्यापीठामार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या शैक्षणिक वर्षापासून सर्व बिगर स्वायत्त महाविद्यालयांत पदवीच्या तीन आणि चार वर्षीय अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली असून विविध घटकांअतर्गत त्याची सुयोग्य रचना करण्यात आली असल्याचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रा. कविता लघाटे यांनी सांगितले. त्याचबरोबर भारतीय ज्ञान प्रणाली अंतर्गत प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूंचे जतन आणि संवर्धनाचा अभ्यास करण्याची भूमिका त्यांनी विशद केली. कार्यशाळेला उपस्थित इतरही मार्गदर्शकांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेला विविध घटकांतून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता याची व्याप्ती वाढवून पुढील आठवड्यात तलासरी येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.