आरोग्य सेवेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी पर्ड्यू विद्यापीठाशी शैक्षणिक सामंजस्य
सेमी कंडक्टर क्षेत्रातील अद्ययावत संशोधनासाठीही सहकार्य
मुंबई, दि.२६ ऑगस्टः मुंबईसह, महाराष्ट्र आणि देशातील आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य सेवेतील महत्वपूर्ण संशोधन विद्यापीठात होणार आहे. मुंबई विद्यापीठातील ‘एआय इन हेल्थ केअर सेंटर’च्या माध्यमातून आरोग्य सेवेतील विदा संकलन, विश्लेषण आणि निष्कर्ष काढण्यासाठी अमेरिकेतील प्रतिष्ठित पर्ड्यू विद्यापीठाशी शैक्षणिक सामंजस्य करण्यासाठी विद्यापीठाने स्वारस्य दाखवले आहे. लवकरच दोन्ही विद्यापीठात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या ‘एआय इन हेल्थ केअर सेंटर’च्या माध्यमातून मुंबईतील अनेक रुग्णालयातील महत्वपूर्ण विदा संकलीत केली जात असून त्याचे योग्य विश्लेषण करून व निष्कर्ष काढून संभाव्य धोके टाळण्यासाठी आणि भविष्यकालीन उपाययोजना करण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. नुकतेच मुंबई विद्यापीठाच्या शिष्टमंडळाच्या वतीने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलगुरू यांनी अमेरिकेतील पर्ड्यू येथे पर्ड्यू विद्यापीठातील व्हाईस प्रेसिडेंट ऑफ ग्लोबल पार्टनरशिप्स अँड प्रोग्राम्स आणि डायरेक्टर ऑफ सेमी कंडक्टर एज्युकेशनचे प्रा. विजय रघुनाथन यांची भेट घेऊन कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सहाय्याने आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी विविध विषयांवर चर्चा केली. पर्डयू विद्यापीठाकडे असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानच्या सुविधा आणि प्रगत संसाधनाच्या माध्यमातून भारतातील रुग्णालयातील संकलित विदा व त्याचे विश्लेषण आणि निष्कर्ष काढण्यासाठी पर्ड्यू विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापक मुंबई विद्यापीठास सहकार्य करणार आहेत. नजीकच्या काळात या क्षेत्रातील सहपदवीच्या शिक्षणासाठीही पाऊले उचलली जाणार असल्याचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
याचबरोबर भारताच्या सेमी कंडक्टर मिशनला सहकार्य करण्यासाठीही विद्यापीठातील नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नोलॉजी विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या सेमी कंडक्टर क्षेत्रातल्या संशोधनाला चालना मिळण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा आणि उपकरणांच्या माध्यमातून सेमी कंडक्टर क्षेत्रातील प्रगत संशोधनासाठी दोन्ही विद्यापीठात शैक्षणिक सामंजस्य केले जाणार आहे. तसेच मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांना फॅकल्टी प्रोग्रामच्या अनुषंगाने प्रशिक्षणही उपलब्ध करून दिले जाणार आहे. या अनुषंगानेही कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी पर्डयू विद्यापीठातील डायरेक्टर ऑफ सेमी कंडक्टर एज्युकेशनचे प्रा. विजय रघुनाथन यांच्याशी चर्चा केली. नजीकच्या काळात माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र आणि नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नोलॉजी या क्षेत्रात सह पदवीचे शिक्षण आणि प्रगत संशोधनाच्या क्षेत्रातही शैक्षणिक सहकार्य यावरही सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याचेही कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.