देवरी,दि.२८- आपण जिथे आपले बालपण घालविले आणि ज्या शाळेत विद्यार्जन केले, त्या शाळेचे आपणाला काहीतरी देणे लागते, ही जाणीव काही मोजकेच लोक ठेवतात. अशीच काहीशी भावना मनात ठेवत माजी विद्यार्थी शालू गौरीशंकर वासनिक यांनी मरामजोबच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्याना कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचा बचाव करता यावा, म्हणून ऊबदार स्वेटर विद्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त (दि.२७) भेट दिल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष मगंला शेंडे ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नितेश वालोदे,शालु गौरीशंकर वासनिक, राजकुमार सोनुले, संजय बोरसरे, उषा कोरे,राणी लांडे,शाळेचे मुख्याध्यापक यु.ए.टेंभूरकर, आनंद डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सौ वासनिक यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील स्मृतींना उजाळा दिला. विद्यार्थ्यानी आपले उज्जल भविष्य घडविण्यासाठी खूप मेहनत घेण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. विद्यार्जनातून आपले उज्ज्वल भविष्य घडू शकते म्हणून श्रमाला पर्याय नाही, असा महत्वपूर्ण सल्ला त्यांनी यावेळी बोलताना दिला.
सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक भेंडारकर सर यांनी केले. उपस्थितांचे आभार चित्रा नितीन राऊत यांनी मानले.