पुणे-खासगी शाळांच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांचा दर्जा सुधारावा, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील 303 शाळा ‘मॉडेल स्कूल’ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी तब्बल 417 कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला असून, जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी – District Planning Committee) बैठकीत या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.
‘मॉडेल स्कूल प्रकल्प’ अंतर्गत शाळांच्या भौतिक, शैक्षणिक विकासासह लोकसहभागावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे एका वर्षात शाळांचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. भौतिक सुविधांमध्ये शाळादुरुस्ती, नवीन वर्गखोली, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आदी सुविधांचा समावेश आहे. शैक्षणिक गुणवत्ता विकासात जर्मन, स्पॅनिश आणि फ्रेंच भाषांचे प्रशिक्षण, कोडिंग, मल्लखांब, मुलींचे शिक्षण, इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रम राबविले जाणार आहेत.
निधी कसा मिळणार?
‘मॉडेल स्कूल प्रोजेक्टमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची दर्जावृद्धी होणार आहे. सर्वसामान्य मुलांना चांगले शिक्षण मिळण्याची सोय होणार आहे,’ असे गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी स्पष्ट केले.
‘पुणे जिल्ह्यात 303 केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रातील एका शाळेची मॉडेल स्कूलसाठी निवड करण्यात आली आहे. त्यानुसार 303 शाळांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. पुढील पाच वर्षे असाच प्रकल्प राबविला जाणार आहे,’ असे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.