आशय पुनेश्वर डोंगरवारची आयआयएससी बंगळुरू इंटर्नशिपसाठी निवड

0
116

नवेगावबांध  :  येथील मुळ रहिवासी आणि सध्या नवोदय विद्यालय तळोधी (बाळापूर) येथे शिक्षण घेत असलेला आशय पुनेश्वर डोंगरवार याची देशातील सर्वोच्च संशोधन संस्था असलेली भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) बंगळुरू (IISC Bangalore Internship) येथे एक महिन्याच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. ही निवड महाराष्ट्रातील केवळ पाच विद्यार्थ्यांमधून करण्यात आली असून, आशयचा त्यात समावेश होणे ही नवेगावबांधसह संपूर्ण विदर्भासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

आशयचे वडील आणि आई हे दोघेही सिंदेवाही तालुक्यातील शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. घरातून मिळालेल्या  शैक्षणिक प्रेरणेचा उपयोग करत आशयने अभ्यास, वैज्ञानिक उपक्रमांमधील सहभाग, तसेच मुलाखतीत उत्कृष्ट कामगिरी केली आणि ही मानाची निवड मिळवली. २९ एप्रिल ते २८ मे २०२५ या कालावधीत आशय भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू येथे आपली इंटर्नशिप पूर्ण करणार आहे.

या (IISC Bangalore Internship) इंटर्नशिपच्या माध्यमातून त्याला इस्त्रोच्या प्रयोगशाळेला भेट, तसेच देशातील नामवंत शास्त्रज्ञांशी प्रत्यक्ष संवाद आणि मार्गदर्शन मिळणार आहे. ही संधी केवळ अभ्यासापुरती मर्यादित नसून, आशयसारख्या होतकरू विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. आशयच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक पातळीला नवीन उंची मिळाली आहे. नवोदय विद्यालयाचे शिक्षकवृंद, त्याचे पालक, आणि नवेगावबांध ग्रामस्थांनी त्याच्या यशाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन व्यक्त केले आहे.