गडचिरोली : नागपूर स्थित विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथील पीठासीन अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने गेल्या ५ महिन्यांपासून पद रिक्त होते. रिक्त पीठासीन अधिकारी पद नियुक्त करण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उच्च शिक्षण मंत्री, अवर मुख्य सचिव यांची भेट घेऊन मागणी केली होती. त्यानुसार १७ एप्रिल २०२५ रोजी शासनाने आदेश काढून पिठासीन अधिकारी नियुक्त केल्याने मागणीला यश आले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६ कलम ८१ अन्वये राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणेची स्थापना करण्यात आली आहे. सदर न्यायाधिकरणाची कार्यक्षेत्र ही विद्यापीठ व संलग्नीत खाजगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सेवाविषयक याचिका व अपील याचिका यांचा निपटारा करण्याची तरतुद विषद करण्यात आली आहे. परंतु, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ अमरावती व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कार्यक्षेत्रातील नागपूर स्थित विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथील पीठासीन अधिकारी दि. ३०/१०/२०२४ रोजी सेवानिवृत्त झाल्याने गेल्या ५ महिन्यांपासून पद रिक्त होते. सदर कार्यक्षेत्रातील अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या बडतर्फ, सेवानिवृत्त कर्मचारी, निवृत्त वेतन, पदोन्नती, वेतननिश्चिती याचिका, अनेक तक्रार निवारण समिती अपील याचिका व अन्य सेवाविषयक याचिका प्रलंबित असून न्यायाच्या प्रतिक्षेत होते. त्यामुळे तात्काळ पिठासीन अधिकारी नियुक्ती करण्याची मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, अवर मुख्य सचिव श्री. बी. वेणूगोपाल रेड्डी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली होती.
त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दि. १७ एप्रिल २०२५ रोजी शासन आदेश काढून नागपूर येथील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणाच्या पीठासीन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार न्या. बी.यु. देबडवार यांच्याकडे देण्यात आलेला आहे. त्यांच्या नियुक्तीने न्यायाधिकरणातील प्रलंबित प्रकरणे निकाली निघणार आहे. भविष्यात नियमित पिठासीन अधिकारी नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अडबाले यांनी सांगितले.न्यायाधिकरण कार्यक्षेत्रातील प्राध्यापक, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आमदार सुधाकर अडबाले यांचे आभार मानले आहे.