
गोंदिया ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. १३) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. यात येथील विवेक मंदिर शाळेच्या विद्यार्थिनी हर्षिता अनिल मदनकर व स्वाती सुनीलकुमार श्रीभात्रे या दोघीही जिल्ह्यात प्रथम आल्या आहेत. दोघींनाही प्रत्येकी ९७.४० टक्के गुण आहेत. जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.८४ टक्के इतका आहे. निकालात विद्यार्थिनींनीच बाजी मारली असून, त्यांच्या निकालाची टक्केवारी ९५.८१ इतकी, तर मुलांच्या निकालाची टक्केवारी ९०.१० इतकी आहे.
इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालानंतर दहावी परीक्षेच्या निकालाची उत्सुकता केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनादेखील होती. अखेर शिक्षण मंडळाने मंगळवारी ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर केला. गतवर्षीची परंपरा कायम राखत विद्यार्थिनी यंदाही टक्केवारीत समोर आहेत. जिल्ह्यात एकूण १८ हजार २५९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेकरिता नोंदणी केली होती. यापैकी १८ हजार १७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात एकूण १६ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेला एकूण नऊ हजार ४५५ विद्यार्थी, तर आठ हजार ७१९ विद्यार्थिनी बसल्या होत्या. यापैकी आठ हजार ५१९ विद्यार्थी आणि आठ हजार ३५४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९०.१०, तर विद्यार्थिनींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.८१ इतकी आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थिनी समोर राहिल्या. जिल्ह्याचा निकाल ९२.८४ टक्के इतका आहे. जिल्ह्यात आमगाव तालुका टाॅप ठरला असून, या तालुक्याचा एकूण निकाल ९४.३३ टक्के आहे, तर गोरेगाव तालुक्याचा सर्वाधिक कमी म्हणजेच ८८.४६ टक्के इतका निकाल आहे. येथील विवेक मंदिर शाळेच्या विद्यार्थिनी हर्षिता अनिल मदनकर व स्वाती सुनीलकुमार श्रीभात्रे या दोघीही जिल्ह्यात प्रथम आल्या आहेत. दोघींनाही प्रत्येकी ९७.४० टक्के गुण आहेत.