
*अर्जुनी मोरगाव:* पंचशील विद्यालयाने यंदाच्या फेब्रुवारी/मार्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ.१० वी) परीक्षेत घवघवीत यश मिळवत शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. शाळेचा एकूण निकाल ९८.१८ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिनांक १३ मे रोजी दुपारी ठीक १ वाजता महाराष्ट्र परीक्षा बोर्डाकडून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला.
या परीक्षेत पंचशील विद्यालयातील १६ विद्यार्थ्यांनी प्राविण्य, १३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर २२ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली. सुजाता संतोष मंडले या विद्यार्थिनींनी शेकडा गुण ८९.८०, अनिकेत मच्छिंद्र उजवणे ८८.६०, देवयानी दिलीप किरसान ८८.२०, प्रिन्स रंजीत चवरे ८५.८०, देवेश गिरधारी हरदुले ८४.२० तर मयूर माणिक फुंडे या विद्यार्थ्यांनी शेकडा गुण ८४.०० घेतले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
ही कामगिरी शाळेच्या शैक्षणिक उंचीचे द्योतक आहे. संस्थेचे सचिव अशोक रामटेके यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदानही त्यांनी गौरवले. शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एम. चव्हाण यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी चिकाटी, नियमित अभ्यास व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने हे यश संपादन केले. त्यांच्या यशात पालकांचाही मोलाचा वाटा आहे.” विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संपूर्ण पंचशील विद्यालय परिवारात आनंदाचे वातावरण असून भविष्यातही अशाच प्रकारे यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास परीक्षा प्रमुख एन पी समर्थ यांनी सर्वांच्या वतीने व्यक्त केले.