
आमदार सुधाकर अडबाले यांची शिक्षण राज्यमंत्री, प्रधान सचिवांकडे मागणी
गडचिरोली : शैक्षणिक सत्र २०२४-२५ ची शिक्षक संचमान्यता राज्यातील बहुतांश शाळांना नुकतीच वितरीत करण्यात आलेली आहे. यात प्रामुख्याने संचमान्यतेत राज्यातील अनेक शाळांना शुन्य शिक्षक मंजूर झाल्यामूळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे दि. १५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यतेबाबतचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयासमोर नुकतेच एक दिवसीय विदर्भस्तरीय धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी मंत्रालयात शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकजजी भोयर, प्रधान सचिव रणजीत देओल, उपसचिव तुषार महाजन यांची भेट घेऊन विषयाची गंभीरता लक्षात आणून दिली.
दि. २८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार यापूर्वीचे संच निर्धारण होत होते. त्याप्रमाणेच शैक्षणिक सत्र २०२४-२५ चे संच निर्धारण करण्यात यावे व दि. १५ मार्च २०२४ रोजीचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने झालेल्या धरणे/ निदर्शने आंदोलनाचे निवेदन आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकजजी भोयर, प्रधान सचिव श्री. रणजीत देओल यांना दिले व शिक्षकांवर अन्याय करणारा सदर शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी लावून धरली.