38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home शैक्षणिक बोगस शिक्षक भरती व शालार्थ आयडी घोटाळ्यात माजी.खा.मेंढेच्या भावाचेही नाव,सतिश मेंढे फरार

बोगस शिक्षक भरती व शालार्थ आयडी घोटाळ्यात माजी.खा.मेंढेच्या भावाचेही नाव,सतिश मेंढे फरार

0
3468

नागपूर/गोंदिया,दि.२५– बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात निवृत्त विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व तत्कालीन शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव व नागपूरच्या तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना बेड्या ठोकल्यानंतर आता विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) रडारवर तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे असल्याची विश्वसनीय माहिती आहे. सतीश मेंढे हे भंडारा-गोंदियाचे माजी खासदार सुनील मेंढे यांचे बंधू असून ते २०१९-२० या काळात नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर कार्यरत होते. विशेष म्हणजे हा घोटाळा सर्वात प्रथम गोंदिया जिल्ह्यात २०२० मध्येच उघडकीस आला होता,मात्र त्यावर पाहिजे तशी कारवाई शासनाने व पोलीस विभागाने केली नव्हती.

घोटाळ्यातील अटकेतील अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. यानंतर घोटाळ्याला खतपाणी घालणारे काही शिक्षणाधिकारी, शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, बोगस शिक्षक आणि मध्यस्थही एसआयटीच्या टप्प्यात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या प्रकरणात २०१९ ते २०२५ पर्यंत तयार करण्यात आलेल्या बोगस शालार्थ आयडीचा तपास केला जात आहे. या घोटाळ्यात माजी उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीतून अटक करण्यात आली होती. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी लक्ष्मण मंघाम याला अटक केल्यावर दुसऱ्या दिवशी माजी शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांना अटक केली.
गुरुवारी या प्रकरणात चिंतामण वंजारी यांनाही अटक करण्यात आली. सायबर पोलिसांनी शालार्थ आयडीचा तपास करून त्यातून कोणाच्या कार्यकाळात किती बनावट आयडी देण्यात आले याचा शोध घेण्यात आला. यात तत्कालीन उपसंचालक वैशाली जामदार आणि माजी सेवानिवृत्त उपसंचालक सतीश मेंढे यांचेही नाव पुढे आले.या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांचेही अटक वॉरंट काढून वैशाली जामदार यांना छत्रपती संभाजीनगरातून अटक केली. मेंढे यांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक गुरुवारी भंडारा येथे गेले होते. तिथे मात्र ते नसल्याचे आढळून आले.पोलिसांच्या हाती लागले नाही. याशिवाय त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानीही चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे

शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपूर शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालक व छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना शुक्रवारी (23 मे) अटक करण्यात आली.या घोटाळ्यात अटक झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. गुरुवारीच (२२ मे) पोलिसांनी नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनादेखील अटक केली होती. राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आतापर्यंत शिक्षण विभागातील आठहून अधिक अधिकारी-कर्मचारी तसेच एका शिक्षकाला अटक करण्यात आली होती.

मंघामने सांगितली मोठ्या अधिकाऱ्यांची नावे

सदर पोलिस ठाण्याच्या पथकाने तीन दिवसांअगोदर लक्ष्मण उपासराव मंघाम (४७, वासंती अपार्टमेंट, आकांशी ले-आउट, दाभा) याला अटक केली होती. तो अगोदर शिक्षण उपसंचालक कार्यालयात लिपिक होता. २०१९ सालापासून तो बनावट शालार्थ आयडी तयार करत होता. यासाठी तो कार्यालयाच्या बाहेरील संगणकांचा वापर करत होता.

जामदार यांच्या काळात २११ आयडी
वैशाली जामदार या २०२१ ते २०२३ यादरम्यान नागपुरात उपसंचालक होत्या. त्यांच्या कार्यकाळात २११ बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.

समितीत वंजारीचा होता समावेश
१ या प्रकरणात २०१९ ते २०२४ पर्यंत तयार करण्यात आलेल्या शालार्थ आयडीचा तपास करण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अधिकारी माधुरी सावरकर यांच्या नेतृत्वात एक समिती नेमण्यात आली होती.
२ या समितीत चिंतामण वंजारी याचा समावेश होता. समितीच्या अहवालाच्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड याच्या निर्देशावरून सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
२०१९ पासून बोगस शालार्थ आयडी बनवून शिक्षकांना नियुक्त करण्यात येत आहे. २०२५पर्यंत हा घोटाळा सुरू होता.
तत्कालीन उपसचांलकांपासून तर सर्वच संबंधित या घोटाळ्यात गुंतले आहेत.
६२२ शिक्षकांपैकी ७५ शिक्षकांची नियमानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित ५४७ शिक्षक बोगस आहेत.
या शिक्षकांकडून नियुक्तीसाठी २० ते २५ लाख रुपये घेण्यात आल्याचे एसआयटीच्या तपासात आतापर्यंत समोर आले. सरासरी २० लाख रुपये केल्यास हा आकडा १०० कोटींच्या वर जातो.

blank