
’समर स्कूल ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट’साठी एम. ए. पब्लिक पॉलिसीच्या विद्यार्थांची निवड
मुंबई, दि.२२ जून: मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व नागरीशास्त्र विभागातील एम.ए. पब्लिक पॉलिसीच्या १४ विद्यार्थ्यांची तैवान येथे आयोजित होत असलेल्या “समर स्कूल ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट” या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. शाश्वततेसाठीच्या धोरणात्मक संकल्पनांवर अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी हे विद्यार्थी आज तैवानसाठी रवाना झाले आहेत. नॅशनल चुंग हसिंग विद्यापीठ, तायचुंग, तैवान आणि नॅशनल चुंग हसिंग विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लॉ अॅण्ड पॉलिटिक्स विभागात २५ जून, २०२५ पासून दहा दिवसांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सार्वजनिक धोरणाच्या क्षेत्रात नव्या संधींची दालने उघडली जात असताना, जागतिक स्तरावर शाश्वत विकास उद्दिष्टांकडे (Sustainable Development Goals – SDGs) वेगाने वाटचाल सुरू आहे. या दोन महत्त्वाच्या प्रवाहांचा संगम साधत मुंबई विद्यापीठ आणि नॅशनल चुंग हसिंग विद्यापीठ, तायचुंग, तैवान यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या अभ्यासक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे भारतातील तैवानचे नवनियुक्त राजदूत प्रा. मुमिन चेन यांनी या अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. यापूर्वी प्रा. चेन यांनी नवी दिल्लीतील तैवान एज्युकेशन अँड कल्चरल सेंटरमध्ये उपप्रतिनिधी म्हणून काम केले आहे.
या समर स्कूलच्या माध्यमातून भारत आणि तैवानमधील तरुण अभ्यासकांना परस्परांकडून शिकण्याची, अनुभव आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची अनोखी संधी उपलब्ध होणार आहे. हे विद्यार्थी भविष्यातील शाश्वततेचे खरे दूत म्हणून काम करतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. भारत आणि तैवानच्या विकासाच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी, शाश्वततेसंबंधित अनेक समस्या दोन्ही देशांना समांतर आहेत. या अभ्यासक्रमामुळे दोन्ही विद्यापीठे दीर्घकालीन दृष्टिकोनातून शाश्वततेसाठीच्या धोरणात्मक संकल्पनांवर एकत्रितपणे विचार करू शकतील तसेच उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरण्याच्या दृष्टीने अशा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक कौशल्यांचा विकास होत असून त्यांना सल्लागार संस्था स्थापन करण्यापासून ते स्टार्टअप सुरू करण्यापर्यंतच्या नवीन संधीचे दालन खुले होऊ शकणार असा आशावाद मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला. त्यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रवासाच्या तयारीविषयी सविस्तर माहिती घेत या आंतरराष्ट्रीय उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. एम.ए. पब्लिक पॉलिसी अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा. मृदुल निळे यांच्या विशेष प्रयत्नातून या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चमू तैवानसाठी आज रवाना झाली आहे.