
अर्जुनी मोरगाव,दि.१४: तालुक्यासह जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत अर्जुनी मोरगाव तालुका शिक्षक संघाच्यावतीने जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची भेट घेत बैठकीत शिक्षकांच्या अडचणींबाबत साकडे घालण्यात आले.
बैठकीत जिल्हा परिषद शाळांची सकाळच्या सत्रातील वेळ (७ ते ११.४०)पूर्ववत करणे, शिक्षक संवर्गाच्या पदोन्नती कार्यशाळा तत्काळ घेणे,जिल्ह्यातील नक्षलग्रस्ताच्या यादीतून वगळलेला भाग पूर्वरत करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणे तसेच वगळलेल्या तालुक्यांच्या वेतन निश्चितीचा पुनर्विचार, BLO कामातून शिक्षकांची सुटका, चटोपाध्याय व निवडश्रेणी वेतनश्रेणीचा लाभ १२ व २४ वर्ष सेवा कालावधीनुसार देणे(प्रशिक्षण दिनांकानुसार नव्हे),चुकीच्या संचमान्यतेचा परिणाम झालेल्या शाळांची संच मान्यता दुरुस्त करणे,माध्यम बदल प्रकरणात १३ शिक्षकांना न्याय देणे व जि.प. शाळा बरडटोलीच्या अडचणींचे निराकरण करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढीकरिता प्रत्येक तालुक्यात आढावा सभा घेऊन प्रयत्न केल्याबद्दल तसेच शिक्षण व शिक्षक हितेशी कार्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष भेडारकर यांचा शिष्टमंडळाद्वारे शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
शिष्टमंडळाला उद्देशून बोलताना भेंडारकर यांनी अनेक समस्यांवर तत्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.सकाळ पाळीची वेळ लवकरच पूर्ववत करण्याचा निर्णय होणार असून, जिल्ह्यातून नक्षलग्रस्त मधून वगळण्यात आलेला जिल्ह्यातील भाग पूर्ववत करण्यासाठी शासन स्तरावर तात्काळ पाठपुरावा करण्यात येईल, पदोन्नतीसंदर्भातील कार्यशाळा या महिन्यातच घेण्यात येणार आहे. BLO कामाबाबत जिल्हा परिषदेकडून ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यासह इतर मुद्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.या सभेचे संचालन कीर्तीवर्धन मेश्राम व रमेश संग्रामे यांनी केले.प्रस्ताविक तालुका अध्यक्ष कैलास हांडगे यांनी केले.आणि कार्यक्रमाचे आभार किशोर लंजे यांनी मानले.
या शिष्टमंडळात अरविंद नाकाडे, गजानन रामटेके, भुवन औरासे, कैलास हांडगे,युवराज खोब्रागडे, चंद्रशेखर गभने, शालिक गावळ, रमेश संग्रामे, किर्तीववर्धन मेश्राम, अरुण फाये, प्रशांत चव्हाण, दीपक लांजेवार ,नितीन तिडके,प्रकाश सांगोडे, अमोल चौरे, गोविंद बगडे, माणिक नंदनवार, जयपाल रूकमोडे, भागवत सोनवाने,सिद्धेश्वर तांदळे, सहदेव बागडेरिया, नामदेव लांडगे, गंगाधर निखारे, परमानंद बागडे, केवळराम बोरकर, मंगेश ढोमणे, प्रभाकर नाकाडे, हेमराज राखडे, नागेंद्र खोब्रागडे, दीपक तागडे,शेषराव दहीकर, धनंजय मडावी, प्रल्हाद कापगते,मनोहर हातझाडे, टेकचंद गावळ, चंदू बुके, सुनील शहारे, हेमराज समरीत व इतरही बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.





