40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home शैक्षणिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना घेता येणार ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांचे संयुक्त शिक्षण

विद्यापीठातील विद्यार्थ्यांना घेता येणार ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांचे संयुक्त शिक्षण

0
44

blank

-सामंजस्य कराराच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया काउंसलेट सोबत चर्चा
-ऑस्ट्रेलियन काऊन्सलेट प्रतिनिधींची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला भेट
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात ऑस्ट्रेलियातील विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत संयुक्त पदवी मिळविण्याची संधी प्राप्त होणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमध्ये उपलब्ध असलेल्या समकक्ष अभ्यासक्रमांचा अभ्यास करीत आगामी काळात अशा प्रकारचा सामंजस्य करार केल्या जाणार आहे. या अनुषंगाने ऑस्ट्रेलियीन काउंसलेटच्या प्रतिनिधींनी विद्यापीठाला शुक्रवार, दि. २५ जुलै २०२५ रोजी भेट देत विद्याशाखांचे अधिष्ठाता व विभाग प्रमुख यांच्या सोबत चर्चा केली.
विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहयोग कार्यालयाच्या वतीने सभाकक्षात आयोजित बैठकीला माननीय प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, ऑस्ट्रेलियन काउंसलेटचे ट्रेड कमिशनर श्री. वीक सिंह, ऑस्ट्रेलियन काउंसलेटच्या ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट (स्किल्स) संचालक श्रीमती श्रेया सिंग, विद्यापीठाचे मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. राजश्री वैष्णव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेघा कानेटकर, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहयोग कार्यालयाचे नोडल ऑफिसर डॉ. विकास जांभुळकर, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग संचालक डॉ. समीत माहोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. डॉ. विकास जांभुळकर यांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियातील विविध विद्यापीठांसोबत अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठात उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती देत ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांसोबत कशाप्रकारे शैक्षणिक अभ्यासक्रम, विद्यार्थी व शिक्षकांचे आदान-प्रदान करता येईल याची माहिती दिली. ऑस्ट्रेलियन काउंसलेटचे ट्रेड कमिशनर श्री. वीक सिंह यांनी ऑस्ट्रेलियातील नागरिकांना भारतीय संस्कृतीबाबत सदैव उत्सुकता असल्याची माहिती देत येथील विविधतेचे शिक्षण घेण्यासाठी तेथील विद्यार्थी येतील, असा आशावाद व्यक्त केला. ऑस्ट्रेलियातील विविध विद्यापीठांमध्ये चालविलेल्या जात असलेल्या विविध कौशल्य अभ्यासक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. या सोबतच ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांचे नवी मुंबई, गुजरात येथे केंद्र स्थापन झाले असून आगामी काळात उत्तर प्रदेश, नवी दिल्ली आणि बेंगळुरू येथे केंद्र सुरू होणार आहे. विद्यापीठासोबत संयुक्त पदवी तसेच दुहेरी पदवी अभ्यासक्रम कशाप्रकारे राबविता येतील, याची माहिती त्यांनी दिली. दोन वर्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर पुढील दोन वर्षे ऑस्ट्रेलियातील विद्यापीठात शिक्षण घेत विद्यार्थ्याला संयुक्त पदवी मिळवता येतील, असे देखील श्री विक सिंह यांनी सांगितले. आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली येथील शैक्षणिक आदान प्रदान मॉड्युल्सचे उदाहरण त्यांनी दिले.
ऑस्ट्रेलियन काउंसलेटच्या ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट (स्कील्स) संचालक श्रीमती श्रेया सिंह यांनी ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त करण्यासाठी कशाप्रकारे अभ्यासक्रम तयार केले आहेत याची माहिती दिली. ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाने गुजरात येथील उद्योगांसाठी स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये कशाप्रकारे कौशल्य विकसित केले. त्यासोबतच केरळ आणि तामिळनाडू येथील कौशल्य विकास कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी विद्यापीठात उपलब्ध असलेल्या सामाजिक शास्त्र अभ्यासक्रमांची माहिती प्रतिनिधींना दिली. यामध्ये प्रामुख्याने अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास आदी विविध मागणी असलेल्या अभ्यासक्रमांची त्यांनी विस्तृत मांडणी केली. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेघा कानेटकर यांनी वाणिज्य व्यवस्थापन सोबतच नव्याने सुरू करण्यात आलेल्या इंडस्ट्री इंटिग्रेटेड कौशल्य प्राप्त करून देणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली. आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. राजश्री वैष्णव यांनी देखील त्यांच्या विद्याशाखा अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांची माहिती दिली. विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. उमेश पलीपुंडवार यांनी विद्याशाखा अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये तसेच विभागांमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक उपकरणे, सुविधा, इंक्युबॅशन सेंटर, रुसा सेंटर आदी विविध उपलब्धींची माहिती दिली. ऑस्ट्रेलिया येथील विविध विद्यापीठांसोबत सहकार्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भविष्यात विविध कौशल्य प्राप्त करून देणारे अभ्यासक्रम सुरू करणार आहे. या सोबतच ऑस्ट्रेलियन विद्यापीठांच्या मदतीने विद्यापीठात सेंटर फॉर एक्सलन्स सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने भविष्यात ऑस्ट्रेलियातील विविध विद्यापीठांसोबत सामांजस्य करार (MoU) केले जाणार आहे.
*विभाग प्रमुखांसोबत चर्चा*
ऑस्ट्रेलियन काउंसलेट प्रतिनिधींनी विद्यापीठ शैक्षणिक परिसरातील विविध विभागांना भेट देत तेथील अभ्यासक्रमांची माहिती घेतली. यानंतर गणित विभागातील रामानुजन सभागृह येथे सर्व शैक्षणिक विभाग प्रमुख यांच्यासोबत शैक्षणिक आदान प्रदान त्याचप्रमाणे संयुक्त अभ्यासक्रम तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सोबतच विविध विभागांसोबत सामंजस्य करार करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहयोग कार्यालयाचे नोडल ऑफिसर डॉ. विकास जांभुळकर यांनी ऑस्ट्रेलियन काउंसलेट प्रतिनिधींना विद्यापीठातील विविध उपलब्ध संसाधनांबाबत विस्तृत माहिती दिली.

blank