गोंदिया,दि.२८ ऑगस्ट– इतर मागास प्रवर्ग (ओबीसी),विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण घेताना वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.गोंदिया जिल्ह्यात मुला-मुलींसाठी १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले असून,या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.याकरीता आज १८ ऑगस्ट ही शेवटची तारीख होती,मात्र ओबीसी संघटनानी शासनाकडे आग्रह धरल्याने आता १८ सप्टेबंरपर्यंत वसतिगृह व आधार योजनेकरीता अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालक सोनाली मुळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
संबंधित विद्यार्थी https://hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतील.अर्जाची प्रक्रिया खालील वेळापत्रकानुसार असेल: अर्ज करण्याचा कालावधी: १ सप्टेंबर २०२५ ते १८ सप्टेंबर २०२५ अर्ज छाननी कालावधी:१९ ते २४ सप्टेंबर,पहिली निवड यादी २५ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर व पहिल्या यादीनुसार प्रवेश अंतिम मुदत १० आँक्टोंबर २०२५,रिक्त जागांसाठी दुसरी प्रतीक्षा यादी प्रवेश अंतिम मुदत : १७ आँक्टोंबर २०२५ असा आहे.
या योजनेत बीए,बीकॉम,बीएससी पदवी अभ्यासक्रम तसेच एमए, एमएससी सारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे.जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन उच्च शिक्षणासाठी सुविधा मिळवावी,असे आवाहन विजय वाकुडकर,उपसंचालक,प्रादेशिक विभाग इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, नागपूर यांनी केले आहे.





