नागपूर – शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पदाचा राजीनामा द्यावा. शिवाय शालेय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांनाही कामावरून कमी करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेत केली. शिक्षक सेवकांना सेवेतून कमी करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे हताश झालेल्या सय्यद रमिझोद्दीन या सेवामुक्त कलाशिक्षकाने आत्महत्या केली. त्यासाठी त्यांनी शिक्षणमंत्री तावडे आणि शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांना जबाबदार धरले आहे. त्यामुळे दोघांवरही खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पाटील यांनी केली.
नियम ९७ नुसार याविषयावर अल्पकालीन चर्चा झाली त्यावेळी ते बोलत होते. शालेय शिक्षण विभागाला सेवामुक्तीच्या अध्यादेशामुळे अनेक शिक्षकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. हा अध्यादेश रद्द करावा अशी शिक्षक संघटनांची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे राज्यातील हजारो अतिरिक्त आणि शिक्षक सेवकांना घरी बसावे लागले. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, कला, क्रीडा, संगीत शिक्षक, ग्रंथपाल यांना घरी बसावे लागले आहे. यातूनच नांदेडच्या सय्यद रमिझोद्दीन या कला शिक्षकाने आत्महत्या केली. आपल्याला आत्महत्येस शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षण सचिव अश्विनी भिडे जबाबदार असल्याचे त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात म्हटले आहे, अशी माहिती चर्चेवेळी कपिल पाटील यांनी सभागृहाला दिली.
‘नवीन सरकार येण्याआधी अच्छे दिन येणार,’ असे सांगत होते. पण हेच का तुमचे अच्छे दिन? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत. आता शिक्षकही आत्महत्या करू लागले आहेत. त्यामुळे हे सरकार कोणत्या दिशेने चालले आहे, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला. शिक्षकांच्या प्रश्नाकडे सरकारने संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे. जर विनोद तावडे हेच शिक्षणमंत्री राहणार असतील तर शिक्षण विभागाचे वाटोळे होईल, असा घणाघाती आरोप पाटील यांनी केला आहे. शिवाय शिक्षण सचिवही या आत्महत्येला तितकेच जबाबदार आहेत. त्यांनाही सेवामुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली. हा विषय संवेदनशील असून सरकारने त्याचा विचार केला पाहिजे, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. ज्या शिक्षकाने आत्महत्या केली तो घरात एकटाच कमावता होता. आता त्याच्या घरच्यांनी काय करावे? असा प्रश्न त्यांनी सरकारला केला.