
विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन; विद्यार्थ्यांच्या मॉडेल्सना उत्तम प्रतिसाद
अर्जुनी-मोर.-स्थानिक शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. C. V. Raman यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी ‘रमन इफेक्ट’चा शोध लावला होता. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 1930 साली त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुर्ले यांच्या हस्ते डॉ. सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी विज्ञान दिन आयोजन समितीचे समन्वयक डॉ. डी. एल. चौधरी, प्रमुख अतिथी डॉ. जी. टी. पालीवाल तसेच वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एल. एन. बोरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
याच निमित्ताने आयोजित विज्ञान प्रदर्शनीचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक मॉडेल्स सादर केली. प्राचार्य व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रकल्पांविषयी माहिती घेतली.
कार्यक्रमाचे संचालन बी.एस्सी. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी रोशन आरसोडे यांनी केले. प्रास्ताविकात डॉ. चौधरी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट स्पष्ट करत विद्यार्थ्यांमधील शास्त्रीय जिज्ञासा जागृत करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
प्रमुख वक्ते डॉ. पालीवाल यांनी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच आधुनिक काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा सुयोग्य वापर करण्याची गरज त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मोहुर्ले यांनी विद्यार्थ्यांनी संशोधन व नवोपक्रम क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
विज्ञान प्रदर्शनीतील स्पर्धेत कु. गौरी दोनोडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. कु. जयश्री बोळणे व ऐश्वर्या खुणे यांनी द्वितीय, तर मोनिका भूमके हिने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अनिकेत मेश्राम, सलोनी बोरकर, निकिता पोतदार व साक्षी मेहेंदळे यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
डॉ. आशिष कावळे व प्रा. मोहन धुराटकर यांनी प्रदर्शनीचे मूल्यांकन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. नितीन विलायतकर, प्रा. अजय राऊत, प्रा. पंकज उके, बादल लाडे, मनोज झोळे, प्रा. हेमंत परशुरामकर तसेच विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला विज्ञान शाखेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





