देवरी : स्थानिक नगर पंचायतच्यावतीने सोमवारी (दि.१३) शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी व १२ तीच्या वर्गातील उत्तीर्ण झालेल्या ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला होता. याप्रसंगी नगर पंचायतकडून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे त्यांचे पालक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी जि. प. हायस्कूल, बाबुराव मडावी हायस्कूल, कमलादेवी हायस्कूल व मनोहरभाई पटेल येथील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शालेय विद्यार्थी तसेच गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदविला. देवरी नगर पंचायत क्षेत्रातील व शेजारील खेडेगावातील जनतेच्या सुविधेसाठी मृतदेहाची तात्पुरती सोय व सुरक्षितता राखण्यासाठी शीतपेटीची पूर्णपणे निःशुल्क व्यवस्था केली आहे. शासनाकडून प्राप्त ‘गडर सफाई यंत्र’ या आधुनिक वाहनाचे नगर पंचायत देवरी येथे परिसरातील जनतेच्या उपस्थितीत थाटात लोकार्पण करण्यात आले. हे लोकार्पण आ. संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. देवरी क्षेत्रातील नामांकित सुफलाम इंडस्ट्रीज देवरी यांच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत नगर पंचायतीला ५ सुका व ओला कचरा साठवण पेट्या आणि ३ अत्याधुनिक कचरा गोळा करणारी वाहन रिक्षा भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्ष संजू उईके, उपाध्यक्ष प्रज्ञा संगीडवार, नगरसेविका सीता रंगारी, कौशल्याबाई कुंभरे, नगरसेवक रितेश अग्रवाल व नगरपंचायतीचे सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





