प्रसिद्ध अभिनेते – दिग्दर्शक अजित भुरे यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद्घाटन संपन्न ; रॅस्पबेरी पाय, अर्डुइनो, इंटरनेट ऑफ थिंग्जसह ९० प्रत्यक्ष प्रकल्पांचा समावेश!
मुंबई, ७ सप्टेंबर : दादर पश्चिम येथील १८९२ साली स्थापन झालेल्या ‘जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट’च्या (General Education Institute) ‘छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूल’ (Chhabildas English Medium School, (CBSE Affiliated) शाळेत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष आणि प्रयोगाधारित शिक्षण मिळावे, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता, गणित व रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट, अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते अजित भुरे यांच्या हस्ते आज झाले. या प्रयोगशाळेमुळे दादर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि इंटरनेट आधारित तंत्रज्ञान प्रत्यक्ष अनुभवण्याची नवी संधी उपलब्ध झाली आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र साळवी यांनी मान्यवरांचे स्वागत करून त्यांना या आधुनिक लॅबद्दल माहिती दिली. कोषाध्यक्ष रवींद्र ताम्रस, संचालिका आरती राऊत, माजी विद्यार्थी विजय पाध्ये यांसह अनेक आजी – माजी विद्यार्थी – संचालक – शिक्षकांची विशेष उपस्थिती लाभली होती.
या प्रयोगशाळेचे प्रात्यक्षिक आणि सादरीकरण कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स सल्लागार डॉ. अमेय पांगारकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी केवळ तंत्रज्ञान समजून न घेता ते स्वतः हाताळावे, प्रयोग करावेत, प्रश्न विचारावेत आणि स्वतःच्या कल्पनांमधून नवनवे प्रकल्प निर्माण करावेत, या उद्देशाने प्रयोगशाळेची रचना करण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत रॅस्पबेरी पाय, अर्डुइनो आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्रज्ञानावर आधारित एकूण ९० प्रत्यक्ष प्रकल्पांचा समावेश आहे. तापमान, आर्द्रता, हवामान, सुरक्षा, हालचाल, मातीतील ओलावा, वायू गळती, आरएफआयडी, प्रकाश नियंत्रण, वाहनतळ, पाण्याची पातळी आदी विविध विषयांवरील प्रकल्प विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तयार करता व हाताळता येणार आहेत. याशिवाय पायथॉन संगणक प्रोग्रामिंग, तर्कशक्ती विकास, ड्रोन जोडणी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध संकल्पनांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शाळेतील वर्गखोल्यांमध्येही आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आकर्षक भित्तिचित्रे, रंगसंगती, आधुनिक बाके(बेंचेस), डिजिटल फलक, पडदे, ध्वनियंत्रणा आणि विविध शैक्षणिक साधनांमुळे वर्गखोल्यांना आधुनिक रूप देण्यात आले आहे. उद्घाटनापूर्वी मान्यवरांनी वर्गखोल्यांची पाहणी केली.
कार्यक्रमात रोबोट, मानवरूपी रोबोट, ड्रोन आणि विविध यांत्रिक उपकरणांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी डॉ. पांगारकर यांच्याशी संवाद साधत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सविषयी अनेक प्रश्न विचारले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य, सर्जनशील आणि जबाबदारीने वापर कसा करावा, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
“तंत्रज्ञान शिकविण्यापेक्षा तंत्रज्ञानातून विचार करायला शिकविणे महत्त्वाचे”
General Education Institute चे अध्यक्ष शैलेंद्र साळवी म्हणाले, “१८९२ पासून शिक्षणाची परंपरा जपत आलेल्या संस्थेने काळानुसार तंत्रज्ञान स्वीकारले आहे. विद्यार्थ्यांना केवळ तंत्रज्ञान शिकविणे हा आमचा उद्देश नाही; तर त्यांना प्रश्न विचारणारे, प्रयोग करणारे आणि स्वतःच्या कल्पनांमधून नवनिर्मिती करणारे विद्यार्थी घडविणे हे आमचे ध्येय आहे.”
अजित भुरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, “मुलांनी केवळ पाठ्यपुस्तकातून ज्ञान घेण्याऐवजी प्रश्न विचारले, प्रयोग केले आणि स्वतः काहीतरी निर्माण केले पाहिजे. या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे कुतूहल आणि उत्साह हीच या उपक्रमाची खरी ताकद आहे.”
मुख्याध्यापिका सौ. कोमल कडवे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी तयार उत्तरे शोधण्याऐवजी स्वतः प्रश्न विचारावेत, प्रयोग करावेत आणि स्वतः नवनिर्मिती करावी, ही आमची भूमिका आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता, गणित आणि रोबोटिक्स’ या प्रयोगशाळेमुळे छबिलदासच्या आमच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक अनुभवाधारित आणि आनंददायी होणार आहे.”
कुतूहल जागविणे हेच मुख्य उद्दिष्ट
“सहज आणि झटपट उत्तरे मिळविण्याची सवय लावण्यापेक्षा विद्यार्थ्यांमधील कुतूहल जागृत करणे” हा या उपक्रमाचा मुख्य विचार आहे. “येथे स्वप्न पाहा • सर्वत्र यश मिळवा” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला चालना देत त्यांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, नवोन्मेष आणि प्रयोगाधारित शिक्षण यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील संधींसाठी सक्षम करण्याच्या दिशेने Chhabildas English Medium School ने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत उपस्थित मान्यवर व पालकांनी नोंदवले.





