29.2 C
Gondiā
Monday, September 7, 2026
Home विदर्भ देसाईगंजकरांची प्रतीक्षा संपली! सिटी सर्व्हेतील आखीव पत्रिकेचा मुहूर्त अखेर निघाला

देसाईगंजकरांची प्रतीक्षा संपली! सिटी सर्व्हेतील आखीव पत्रिकेचा मुहूर्त अखेर निघाला

0
8

देसाईगंज, दि. ७ – गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात जुनी नगरपरिषद, सर्वात मोठी बाजारपेठ आणि जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या देसाईगंज (वडसा) शहराच्या सिटी सर्व्हेची गेल्या ८ वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सिटी सर्व्हेचा प्राथमिक अभिलेख (Draft Property Card) तयार झाला असून तालुका उप अधीक्षक भूमी अभिलेख यांनी नागरिकांकडून हरकती मागविल्या आहेत.
जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या हस्ते दि. ९ एप्रिल २०१८ रोजी या सिटी सर्व्हेच्या कामाचा शुभारंभ झाला होता. जमीन महसूल अधिनियम नियम १९६७ चे नियम २(२) अन्वये बजावलेल्या नोटिशीनुसार चौकशी अधिकाऱ्यांनी मौजा वडसा (जुनी) येथील मिळकतींची चौकशी पूर्ण केली आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये मौजा जुनी वडसा गावाचे नगर भूमापनाचे काम पूर्ण झाले असून त्याचा प्राथमिक अभिलेख तयार करण्यात आला आहे.

#### नागरिकांसाठी महत्त्वाच्या तारखा व सूचना

१. अभिलेख पाहण्यासाठी कालावधी : दि. ०९/०९/२०२६ ते २३/०९/२०२६ (एकूण १५ दिवस) कार्यालयीन वेळेत.
२. ठिकाण : गाव चावडी / उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, देसाईगंज.
३. काय पाहायला मिळणार? : चौकशी पंजी, मोजणी आलेख (Soft Copy), प्रारूप आखीव पत्रिका आणि मिळकत धारकांची यादी (Excel Sheet).

#### उप अधीक्षक मुकेश सेलोकर यांचे आवाहन

सर्व जमीनधारक, घरमालक आणि हितसंबंधी व्यक्तींनी विहित मुदतीत कार्यालयात उपस्थित राहून आपल्या मालमत्तेचे क्षेत्रफळ, सीमा आणि मालकी हक्काच्या नोंदी तपासून घ्याव्यात, असे आवाहन तालुका उप अधीक्षक मुकेश सेलोकर यांनी केले आहे.

हरकत कशी नोंदवावी?
जर नोंदीबाबत, क्षेत्राबाबत किंवा नावाबाबत काही आक्षेप असेल तर ही बातमी प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत लेखी हरकत आवश्यक पुराव्यांसह (खरेदीखत, जुने उतारे, वैध कागदपत्रे) उप अधीक्षक तालुका भूमी अभिलेख कार्यालयात सादर करावी.

विहित मुदतीत हरकत न आल्यास किंवा प्राप्त हरकतींची वैध पुराव्यांनिशी पडताळणी करून अभिलेख अचूक आहे असे गृहीत धरून अंतिम कायदेशीर प्रख्यापन (Promulgation) करण्यात येईल आणि मिळकत पत्रिका (Property Card) अंतिम केली जाईल, असेही आदेशात म्हटले आहे.या निर्णयामुळे देसाईगंज शहरातील मालमत्ता धारकांच्या मालकी हक्काचा प्रश्न कायमचा निकाली निघणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.