गोंदिया: जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृहात आयोजित सोहळ्यात जि. प. हिंदी पूर्व माध्यमिक शाळा, बिरसोला येथील पदवीधर विषय शिक्षक चंदु गोविंदा दुर्गे यांना ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पत्नी नितु दुर्गे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चंद्रा दोनतुला यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. शिक्षण सभापती सुरेश हर्षे यांच्यासह जि. प. पदाधिकारी व अधिकारी वर्ग या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दुर्गे यांचे उल्लेखनीय योगदान:
-
शैक्षणिक व डिजिटल कार्य: रोबोटिक्स, डिजिटल शिक्षण व उपचारात्मक वर्गांच्या माध्यमातून गुणवत्ता वाढवली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे २४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले, तर तन्वी दंदरे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
-
क्रीडा व सांस्कृतिक: विद्यार्थ्यांना ‘अटल क्रीडा महोत्सव’ आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये जिल्हा स्तरावर यश मिळवून दिले.
-
सामाजिक बांधिलकी: आई-वडील हयात नसलेल्या ३ गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या इयत्ता १२ वी पर्यंतच्या सर्व शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे.
-
इतर उपक्रम: ‘दप्तरविना शनिवार’, वृक्षारोपण, आपत्ती व्यवस्थापन आणि स्वीप (SVEEP) अंतर्गत मतदार जनजागृती उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला; ज्याची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे.त्यांच्या या चौफेर कामगिरीमुळे बिरसोला शाळा व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





