सालेकसा आश्रमशाळेचे कर्मचारी बेमुदत उपोषणावर

0
13
वाढदिवसाच्या शुभेच्छा

देवरी- अप्पर आयुक्तांच्या पत्राला केराची टोपली दाखवत देवरीच्या आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी सालेकसा येथील ईठाई आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे समायोजन वा वेतन अदा केले नाही. परिणामी, आपल्या हक्कासाठी त्या कर्मचाऱ्यांनी चक्क प्रकल्प कार्यालयासमोर आज (ता.12) पासून बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सालेकसा तालुक्यातील ईठाई अनुदानित आदिवासी आश्रमशाळेची मान्यता 11 ऑगस्ट 2014 रोजी शासनाने कायमस्वरुपी काढून टाकली होती. यामुळे त्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे समायोजन अन्य शाळांत करणे आणि समायोजन होईपर्यत 19 कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन अदा करण्याचे आदेश अप्पर आदिवासी आयुक्त नागपूर यांनी देवरीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिले. असे असताना प्रकल्प अधिकाऱ्याने अद्यापही 14 कर्मचाऱ्यांचे समायोजन केले नाही. शिवाय अप्पर आय़ुक्तांच्या पत्राला केराची टोपली दाखवत प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यांना वेतनही अदा केले नाही. परिणामी,गेल्या चार महिन्यापासून सदर कर्मचारी वेतनाविना आहेत. दरम्यान, आर्थिक व मानसिक त्रासाने ग्रस्त असलेले एस एम रामे या कर्मचाऱ्याचा गेल्या 6 जानेवारीला मृत्यू झाला. तरीही प्रकल्प अधिकाऱ्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. परिणामी, प्रकल्प अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून अखेर आज 12 तारखेपासून ईठाई आश्रमशाळेचे 14 ही कर्मचाऱ्यांनी अखेर देवरीच्या प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.