24.7 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home शैक्षणिक पाली विद्यापीठासाठी विधानभवनावर शांती मार्च

पाली विद्यापीठासाठी विधानभवनावर शांती मार्च

0
25

नागपूर,दि.15ः- पाली विद्यापीठ निर्मितीसाठी पाली विद्यापीठ निर्मिती संघर्ष समितीतर्फे गुरुवारी भव्य शांती मार्च काढण्यात आला. यशवंत स्टेडियमहून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व भिक्षू संघाने केले. या मोर्चामध्ये भिक्षू संघासह उपासक – उपासिका सहभागी होते. यावेळी पाच सदस्यीय शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. पाली विद्यापीठ स्थापनेसाठी एक समिती गठित करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला आश्‍वासन दिले. शिष्टमंडळात भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, भंते सदानंद महास्थवीर, डॉ. भाऊ लोखंडे, डॉ. बालचंद्र खांडेकर, डॉ. क्रिष्णा कांबळे यांचा समावेश होता. भारतीय राज्यघटनेच्या शेड्यूल्ड-८ मध्ये पाली भाषेचा समावेश करावा, पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, शैक्षणिक संस्थांमध्ये संस्कृतप्रमाणेच पालीच्या अध्ययन अध्यापनाची सोय करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यशवंत स्टेडियमपासून निघालेला मोर्चा एलआयसी मार्गावरील स्टापिंग पाँइंटवर अडविण्यात आला. यावेळी मान्यवरांनी पाली भाषेची गरज आणि महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
मागील २0 ते २५ वर्षांपासून पाली विद्यापीठ निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाला अनेकदा निवेदने देण्यात आली, अनेकदा मोर्चेही काढण्यात आले. मात्र, शासनाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. यासंबंधी मागील वर्षी अधिवेशनादरम्यान भिक्षूसंघाच्या नेतृत्वात भव्य मार्च काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ५0 हजार नागरिकांच्या स्वाक्षर्‍यांचे निवेदनही सादर करण्यात आले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला होता. औरंगाबाद येथील अजिंठा-वेरूळ महोत्सवातही महाराष्ट्रात पाली विद्यापीठ स्थापनेची घोषणाही केली होती. यानंतरही मुख्यमंत्र्यांना अनेकदा निवेदने देण्यात आले मात्र, अद्याप पाली विद्यापीठाबाबत कुठल्याही प्रकारची हालचाल झाली नाही. राज्यात संस्कृत विद्यापीठाची स्थापना करण्यात आली, ही आनंदाची बाब आहे. मात्र, संस्कृतपेक्षाही प्राचीन असलेल्या व भारताची मूळ भाषा असलेल्या पाली भाषेसाठी विद्यापीठाची निर्मिती करणे आवश्यक आहे. देशात महाराष्ट्रात पालीचे सर्वाधिक विद्यार्थी आहेत. जगात बौद्ध राष्ट्र नसणार्‍या देशांमध्येही पालीच्या मोठमोठय़ा संस्था कार्यरत आहेत. मात्र, भारत पालीचे उगमस्थान असूनही येथे पालीबाबत उदासीनता दिसून येत असल्याची खंत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.