Home शैक्षणिक अंशदायी पेंशनच्या पावत्या दोन महिन्यांत देणार

अंशदायी पेंशनच्या पावत्या दोन महिन्यांत देणार

0

गोंदिया : नागपूर विभागातील प्राथमिक शिक्षकांना अंशदायी पेंशनच्या पावत्या दोन महिन्यांत देवून विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी दिले.
धंतोली येथील बालभारती भवनातील नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहविचार सभा पार पाडली. या वेळी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघासोबत (दि.२२) झालेल्या सहविचार सभेत ते बोलत होते.
शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्या अध्यक्षतेत विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक तथा शिक्षण मंडळाचे माजी सदस्य व शिक्षक नेते मिलिंद वानखेडे, जिल्हा संघटक राजेंद्र खंडाईत, जिल्हा संघटन सचिव खिमेश बढिये, गोंदिया जिल्हा संघटक बाळकृष्ण बालपांडे यांच्या उपस्थितीत सहविचार सभा पार पडली.
यात औरंगाबाद व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीसीपीएसची दुहेरी कपात थांबविण्यात यावी, कपात करण्यात आलेल्या डीसीपीएस रकमेसंदर्भात हिशोबाच्या पावत्या मार्च महिन्याअखेर देण्यात याव्यात, मे २०१२ नंतर शिक्षण सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना हिशोबाच्या पावत्या मार्च महिन्याअखेर देण्यात याव्यात, मे २०१२ नंतर शिक्षण सेवेत नियुक्त कर्मचाºयांना संरक्षण देण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.
तसेच १२ वर्षे व १४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी लागू करावी, गोंदिया जिल्ह्यातील ६५ प्राथमिक शाळांचे जानेवारीचे थकीत वेतन तातडीने अदा करावे, गोंदिया जिल्ह्यातील शापोआचे जून २०१७ पासून थकीत देयके त्वरित द्यावी, शिक्षण उपसंचालक कार्यालयात थकीत वैद्यकीय देयकांचा तातडीने निपटारा करुन दिलासा द्यावा, यासह इतर अनेक शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली.
प्राथमिक शिक्षकांच्या मागण्या न्यायपूर्ण असून संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देवून तातडीने निपटारा करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण उपसंचालक पारधी यांनी दिले. सदर बैठकीत विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे नागपूर जिल्हा संघटन प्रमुख राजेंद्र खंडाईत, संघटन सचिव खिमेश बढिये, जिल्हा संघटन प्रमुख बाळकृष्ण बालपांडे, कळमेश्वर तालुका संघटक गणेश उघडे, महिला आघाडी संघटक हर्षकला हनवते, रेशिम कापगते, चंद्रशेखर पंचभाई, अभिषेक अग्रवाल, आत्माराम बावनकुडे, राजू भस्मे, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भोयर, संजय धरममाळी, सतीश शरणागत, राजू हारगुडे, मनिष जुनोनकर, बबन देवळे, मनराज गायकवाड, अशोक खंडाईत, प्रदीप चकोले आदी उपस्थित होते.

Exit mobile version