चौथी, सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी, दहा मिनिटे अधिक वेळ

0
21

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणा-या चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ९ लाख २९ हजार ४८०, तर सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ६ लाख ६८ हजार ८०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा रविवारी (२२ मार्च) घेण्यात येणार आहे, अशी माहिती परिषदेचे आयुक्त व्ही. बी. पायमल यांनी येथे दिली.

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्याचा उपाय म्हणून यंदा प्रथमच सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या दिवशीच प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पायमल यांनी स्पष्ट केले. यापूर्वी प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी दोन ते चार दिवस आधीच प्रश्नपत्रिका पोहाेचवल्या जात होत्या. ही पद्धत यंदा प्रथमच बदलण्यात आली आहे. त्यामुळे संभाव्य गैरप्रकारांना आळा बसेल, असे ते म्हणाले. तसेच प्रश्नपत्रिकांमधील चुका टाळता याव्यात यासाठी संबंधित
विषयतज्ज्ञांकडून त्यांची वारंवार पडताळणीही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका : दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या धर्तीवर चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका मिळणार आहे असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे आयुक्त पायमल म्हणाले.