- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना घेता येणार लाभ
वाशिम, दि. १6 : इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल स्कूलची प्रवेश परीक्षा १५ मार्च २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे. अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी, ६ वी, ७ वी आणि ८ वीमध्ये शिकत असलेले अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या प्रवेश परीक्षेसाठी पात्र राहतील.
सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी प्रवेश परीक्षेचे आवेदन पत्र विद्यार्थ्यांकडून भरून घेवून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यालयाकडे २४ जानेवारी २०२० पर्यंत सादर करावेत. विहित नमुन्यातील अर्ज संबंधित शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्याकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. प्रवेश परीक्षा १५ मार्च २०२० रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंतच्या कालावधीत अकोला जिल्ह्यातील कोथळी (ता. बार्शीटाकळी) व बुलडाणा जिल्ह्यातील घाटबोरी (ता. मेहकर) येथील शासकीय आश्रमशाळांमध्ये होणार आहे, असे अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी कळविले आहे.




