मशरूम उत्पादन हा व्यवसाय महिलांसाठी हातकमाईचा मार्ग झाला पाहिजे : पालकमंत्री

0
25

नागपूर दि. १6 : पदवी घेतल्यानंतर लगेच नोकरी हे दिवस संपले असून आता कौशल्य विकासाशिवाय पर्याय नाही. नागपूर जिल्ह्यात मशरूम उत्पादन हा व्यवसाय महिला बचत गटांचा उत्कर्ष करणारा ठरावा, अशी अपेक्षा राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे व्यक्त केली.

नागपूर जिल्ह्यामध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नाविन्यता मार्गदर्शन केंद्रामार्फत राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत चार हजार महिलांना मशरूम उत्पादनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जरीपटका भागातील एक हजार महिलांना प्रशिक्षणाची सुरुवात आजपासून महात्मा ज्योतिबा फुले समाज भवनात करण्यात आली. या सर्व महिलांना हात कमाईचा मार्ग म्हणून मशरूम निर्मिती हा एक स्वतंत्र व्यवसाय झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी केली.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हाधिकारी आर. विमला, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त सिद्धार्थ गायकवाड , जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता नाविन्यता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र.ग. हरडे, नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त बाबासाहेब देशमुख, अधिकारी कौशल्य विकास अधिकारी ज्योती वासुरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात प्रथमच मशरूम उत्पादन या अभ्यासक्रमांतर्गत चार हजार महिलांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचे कार्य अंजना बहुउद्देशीय शिक्षण संस्था पार पडणार आहे.या संस्थेने उद्दिष्ट निर्धारित करून प्रशिक्षण पूर्ण करावे, प्रशिक्षण केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यापुरते मर्यादित न राहता या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे.गरजू आणि गरीब महिलांना एका नव्या व्यवसायाला सुरुवात करता येईल अशा पद्धतीचे दर्जेदार प्रशिक्षण देण्याची सूचना त्यांनी केली.

जिल्ह्यात मशरूम उत्पादन अंतर्गत एकूण चार हजार महिला उमेदवारांना प्रशिक्षण देऊन त्यांचे जीवनमान बदलण्याचा उद्देश कौशल्य विकास विभागाचा आहे. प्रशिक्षणाकरिता जिल्ह्यातील चार केंद्राची निवड करण्यात आली असून यामध्ये पारडी, कुही, उमरेड व उत्तर नागपूर या ठिकाणच्या महिलांचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत 43 बचत गटातील एकूण तीन हजार 964 महिलांना प्रशिक्षण देण्याचे निर्धारित करण्यात आले आहे. कोरोनामुळे विधवा झालेल्या 36 महिलांनादेखील या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी चार तास याप्रमाणे उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार असून सदर प्रशिक्षणाचा कालावधी 54 दिवसांचा आहे. तर अशिक्षित महिलांना रोजगार करता जिल्ह्यातील विविध आस्थापना कंपन्यांसोबत करार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे यातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे अशाच पद्धतीचे उद्दिष्ट घेऊन काम करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

कोरोनामुळे अनेकांना आर्थिक विवंचना सहन करावी लागली आहे. त्यामुळे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेने अतिशय मेहनतीने सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून प्रशिक्षण पूर्ण करावे, प्रशिक्षणाची फलनिष्पत्ती सादर करावी असेही त्यांनी निर्देशीत केले.

या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत यावेळी कौशल्य विकास अधिकारी ज्योती वासूरकर यांनी केले. आभार प्रदर्शन विवेक लोहित यांनी केले तर संचालन स्नेहा वेलिंकर यांनी केले.