नेमक्या कोणत्या क्षेत्रात करिअर करावे हे ठरविताना विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक -अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0
4

यवतमाळ,दि.13 मे. इयत्ता दहावी ,बारावी हा विद्यार्थ्यांसाठी टर्निग पॉईंट असतो. इथून पुढे त्यांच्या करियरला सुरुवात होते. आज शिक्षणासाठी अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत. नेमक्या कोणत्या क्षेत्रात करिअर करावे हे ठरविताना विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आजच्या करियर मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून ही सुवर्णसंधी मिळाली आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपल्या आयुष्याला आकार द्यावा असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे आज छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करियर शिबिराचा शुभारंभ राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी गजानन राजुरकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,यवतमाळचे प्राचार्य विनोद नागोरे, प्राचार्य औ.प्र.सं दारव्हा आर.यु.राठोड, प्राचार्य औ.प्र.सं.आर्णी सुधीर पाटबाने, प्रकल्प अधिकारी,आश्रम शाळा अंतरगाव उषा त्रिपाठी, तसेच प्राचार्य ओ.प्र.सं.लोणार जि.बुलढाणा प्रतिक गुल्हाने यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, युवकांना रोजगार देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी विविध रोजगार मेळाव्याचे आयोजन नियमित  करण्यात येत असते. पण विद्यार्थ्यांनीसुद्धा केवळ इंजिनियरिंग आणि मेडिकल हेच करिअरचे क्षेत्र न निवडता इतर अनेक क्षेत्रातील चांगल्या करिअरच्या संधी घ्याव्यात. त्याचबरोबर शिक्षण घेतानाच इतर कौशल्येसुद्धा आत्मसात करावीत असे विचार मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले.

पालकमंत्र्यांनी यावेळी विविध दालनांना  भेटी देऊन प्रदर्शन दालनाचे फीत कापून उद्घाटन केले.  याप्रसंगी उपस्थित युवक युवतींशी पालकमंत्री संजय राठोड यांनी संवाद साधला.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विद्यार्थ्यांना युवा करिअर या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, इयत्ता 10 वी, 12 वी.नंतर काय? विद्यार्थ्यांनी कोणते करिअर निवडावे त्यासाठीच हे शिबिरे असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे,आणि विद्यार्थ्यांनी शिबिराचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा व आपला व्यक्तिमत्व विकास साधावा, असे आपल्या भाषणातून सांगितले. या शिबिरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते.