शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

0
7

भंडारा, दि. 13 मे, : कोविड काळात पथविक्रेते, फेरीवाले यांच्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. पथविक्रेता, फेरीवाले यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे राहिले. नव्याने परत व्यवसाय सूरू करण्यासाठी पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात आले असून पथ विक्रेत्यांना आत्मनिर्भर करण्यात येत आहे. गोरगरीब, कामगार, सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी सरकार काम करत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना असून या योजनांचा लाभ घ्या, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज येथे केले.

पथविक्रेते व त्यांच्या कुटुंबासाठी स्वनिधी महोत्सवाचे आयोजन लक्ष्मी सभागृह, भंडारा येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, गृहनिर्माण व शहरी मंत्रालयाचे उपसचिव आशिष बागडे, सहआयुक्त नगर पालिका प्रशासन सिद्धार्थ मेश्राम, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक गणेश तईकर, नगर पालिका प्रशासन विभागाचे जिल्हा समन्वय प्रविण पडोळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री. कराड म्हणाले की, बँकांनी प्रलंबित असलेली कर्ज प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत. पथ विक्रेत्यांना सुलभपणे कर्ज मंजूर करावे. पथविक्रेत्यांनी कर्ज नियमित परतफेड केल्यास बँक पुन्हा कर्ज देईल, त्यातुन आपला व्यवसाय वाढविता येईल त्यामुळे आर्थिकदृष्टा सक्षम होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

खासदार सुनील मेंढे म्हणाले की, कोरोना काळात आर्थिक चक्रे थांबली होती. त्यावेळी शासनाने पथविक्रेत्यांना मदतीचा हात दिला. पीएम स्वनिधी अंर्तगत नव्याने व्यवसाय सूरू करण्यासाठी आर्थिक मदत झाली. विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास होत आहे. असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात 3 हजार 833 पथविक्रेत्यांचे पीएम स्वनिधी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले असून 2 हजार 941 विक्रेत्यांचे क्रेडिट लिंक अर्थ सहाय्य मंजूर झाले. त्यापैकी 2 हजार 717 पथविक्रेत्यांना 3 कोटी 55 लक्ष अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे. पीएम स्वनिधी योजना फक्त कर्ज देण्यापर्यंत मर्यादित नसून त्यांच्या कुटुंबाला पीएम मातृवंदना योजना, जननी सुरक्षा योजना, पीएम सुरक्षा विमा योजना, पीएम जीवन ज्योती विमा योजना, पीएम जनधन योजना, पीएम श्रमयोगी मानधन योजना, वन नेशन वन राशन कार्ड व इमारत व इतर बांधकाम कामगार या आठ योजनांचा सुध्दा लाभ देण्यात येत असल्याचे नगर पालिका प्रशासन विभागाचे जिल्हा समन्वयक प्रविण पडोळे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेतलेल्या उत्तम पतशिस्त व डिजिटल व्यवहार यामध्ये चांगली कामगिरी करण्याऱ्या पथविक्रेत्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या महोत्सवात मोठ्या संख्येने पथविक्रेते व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.