28 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home रोजगार/व्यापार कौशल्य विकासाला गती; महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने स्किल सेंटर उभारणीचा निर्णय

कौशल्य विकासाला गती; महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने स्किल सेंटर उभारणीचा निर्णय

0
18

गोंदिया, दि.24 : जिल्ह्यातील तरुणांसाठी रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने स्किल सेंटर उभारण्याचा निर्णय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे आणि संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत शासकीय तंत्रनिकेतन, गोंदिया येथे महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने ट्रॅक्टर स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधताना व्यवस्थापक लेवीस डॉन यांनी माहिती देत सांगितले की, येत्या काळात हे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असून येथे ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक प्रशिक्षण दिले जाईल. या माध्यमातून जिल्ह्यात कुशल प्रशिक्षणार्थी तयार होऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. विशेष म्हणजे, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र उमेदवारांना महिंद्रा कंपनीत नोकरीची संधीही दिली जाणार आहे.

महिंद्रा कंपनीसोबत होणाऱ्या कराराअंतर्गत दरवर्षी 120 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार असून हा करार तीन वर्षांसाठी असणार आहे. यावेळी प्रशिक्षणार्थींना आवश्यक सोयी-सुविधा शासकीय तंत्रनिकेतन येथे उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.तसेच, बैठकीत इन्क्युबेशन व बिझनेस फॅसिलिटेशन सेंटरच्या कार्यप्रणाली, उद्दिष्टे, उपलब्ध सुविधा व भावी उपक्रमांबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली. नवउद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून मदत केली जाणार असून, जिल्ह्यातील 59 महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी 90 मिनिटांचे प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

याशिवाय, आत्मसमर्पित नक्षलवादी तसेच नक्षलपीडित व्यक्तींना नव साक्षर योजना अंतर्गत साक्षर करून कौशल्य विकासाद्वारे त्यांचे पुनर्वसन करण्यावर विशेष भर देण्यात आला.बैठकीत जिल्ह्याच्या कौशल्य विकास आराखड्यावर चर्चा करून सन 2026-27 साठी किमान कौशल्य विकास कार्यक्रमास मंजुरी देण्यात आली.या सर्व उपक्रमांमुळे गोंदिया जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन कौशल्य विकासाच्या क्षेत्रात जिल्हा अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

blank