30.6 C
Gondiā
Wednesday, September 16, 2026
Home रोजगार/व्यापार भंडारा जिल्ह्यासाठी डाक जीवन विमा योजनेत थेट अभिकर्त्यांची भरती

भंडारा जिल्ह्यासाठी डाक जीवन विमा योजनेत थेट अभिकर्त्यांची भरती

0
37

इच्छुक उमेदवारांकडून 23 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविले

 भंडारा, दि. 16 : भारतीय डाक विभागाच्या डाक जीवन विमा योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यासाठी थेट अभिकर्ता (Direct Agent) नियुक्त करण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, अर्जाचा नमुना जवळच्या डाक कार्यालयात उपलब्ध आहे.

थेट अभिकर्ता पदासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे आणि शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बेरोजगार किंवा स्वयंरोजगारित शिक्षित युवक, माजी जीवन विमा सल्लागार, विमा कंपन्यांचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका तसेच सेवानिवृत्त शिक्षक आदी उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र, अर्जदार सध्या अन्य कोणत्याही विमा कंपनीचा एजंट नसावा.

उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार असून, व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, परस्पर संबंधाचे कौशल्य आणि जीवन विम्याबाबतचे ज्ञान या बाबींचा विचार केला जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमा करावी लागेल. ही रक्कम एनएससी अथवा केव्हीपी स्वरूपात ठेवण्यात येईल.

निवडीनंतर उमेदवारास इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची परीक्षा निवड झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर परवाना देण्यात येईल. निवड झालेल्या अभिकर्त्यांना टपाल विभागाकडून वेळोवेळी निश्चित करण्यात येणारे कमिशन दिले जाईल.

इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज प्रवर अधीक्षक, नागपूर ग्रामीण विभाग, तिसरा मजला, सिटी पोस्ट ऑफिस, इतवारी, नागपूर-440002 यांच्या नावे स्पीड पोस्टद्वारे 23 सप्टेंबरपर्यंत पाठवावा. भंडारा जिल्ह्यातील उमेदवारांची मुलाखत 28 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता भंडारा पोस्ट ऑफिस येथे घेण्यात येणार आहे.

उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे, पॅनकार्ड, आधारकार्ड आणि अन्य संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहावे. दहावी किंवा बारावीचे बोर्ड प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा, पॅनकार्ड व आधारकार्डच्या प्रती तसेच संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र (असल्यास) अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी जवळच्या डाक कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र डाक विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. ही नियुक्ती सरकारी नोकरीच्या स्वरूपाची नसल्याचे डाक विभागाने स्पष्ट केले आहे.