गोवारी बांधवांना श्रद्धांजली अर्पण

0
19

नागपूर ः आपल्या न्याय्य हक्‍कांसाठी 114 गोवारी बांधवांनी बलिदान दिले. ते व्यर्थ जाऊ देणार नाही. राज्य आणि केंद्राच्या माध्यमातून मार्ग काढून समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार, असे आश्‍वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

झीरो माइल येथील शहीद गोवारी बांधवांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांनी सर्वप्रथम आदरांजली अर्पण केल्यानंतर श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. या वेळी फडणवीस म्हणाले, लोकशाहीत 23 नोव्हेंबर 1994 हा काळा दिवस सर्वांनाच पाहावा लागला. मात्र, यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. हा समाज अद्याप आर्थिक, सामाजिक आणि रोजगाराच्या दृष्टीने मागासलेला आहे. हे मागासलेपण दूर करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येईल. समाजाने दिलेल्या शक्‍तीचा उपयोग करू. राज्य आणि केंद्राच्या सहकार्याने समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, गोवारी हत्याकांड दुर्भाग्यपूर्ण आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणारी घटना आहे. एक छोटीशी दुरुस्ती करण्यासाठी राज्याने केंद्राकडे शिफारस करावी, यासाठी गोवारी बांधव विधान भवनावर धडकले. सुधाकर गजभे त्यांचे नेतृत्व करीत होते. महाराष्ट्रात देवेंद्र आहे; तसाच तुमच्या आशीर्वादाने मी केंद्रात आहे. त्यामुळे या समाजाला न्याय देण्यासाठी शक्‍य ते प्रयत्न मी केंद्रस्तरावर करीन.