अजूनही पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करून घेण्याची मानसिकता नाही.
पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुष मागे कसे?
सगळ्या बाबतीत स्वतःला पुढे समजणारे पुरुष, या बाबतीत मात्र मागे आहेत बरं का !
“साधी-सोपी-सुलभ,नसबंदी शस्त्रक्रिया लाभदायक”
वाशिम,दि.११ जुलै : आज ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतेवेळी यावर्षी २७ जून ते १० जुलै या कालावधीत दाम्पत्य संपर्क पंधरवाडा साजरा करताना समाजात जनजागृती व संवेदीकरण करण्यात आले असून ११ जुलै ते २४ जुलै २०२४ या कालावधीत प्रत्यक्ष कुटुंब नियोजानाच्या सेवा पुरविण्यावर लक्ष केंद्रात केले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.ठोंबरे यांनी माहिती दिली. या कालावधीत कुटुंब कल्याण शिबिरासाठी आवश्यक तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची ग्वाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे यांनी दिली.
यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनी नसबंदी शस्त्रक्रियेचा इतिहास सांगितला. जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.महेंद्रसिंग चापे यांनी कायमस्वरूपी कुटुंब नियोजनाच्या पद्धतीची माहिती दिली. तर जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिमचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.पराग राठोड यांनी दिली. डॉ.विजय काळे यांनी कुटुंब नियोजनाची आकडेवारी सविस्तरपणे मांडली.
मागील आर्थिक वर्षात एकूण दोन पुरुष शस्त्रक्रिया झाल्या असून ११०७ बिनटाका तर ३५२९ टाक्याच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तसेच २८९१ तांबी, २०९१ PPIUCD बसविण्यात आल्या आहेत. एकूण ३९९३७ गर्भनिरोधक गोळ्यांचे वाटप केले असून एकूण २२६९९३ इतक्या निरोधचे वाटप करण्यात आले आहे.
यावर्षी एप्रिल महिन्यापासून आजपर्यंत एकूण १९३ टाक्याच्या शस्त्रक्रिया झाल्या असून एकूण ७४८ तांबी, ३२७ PPIUCD बसविण्यात आल्या आहेत. एकूण ९८४२ गर्भनिरोधक गोळ्यांचे तर एकूण ४६२६३ इतक्या निरोधचे वाटप करण्यात आले आहे.
मागील वर्षी पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतलेल्यां लाभार्थ्यांचा व त्याकरिता त्यांना प्रवृत्त करणाऱ्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच सामान्य जनतेने जास्तीत जास्त पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करून घेण्याचे व त्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी वैभव वाघमारे यांनी केले.
“मी तर केली. आपले काय” ? असे उद्गार जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी काढताच उपस्थित अनेकांच्या भुवया उंचावल्या यावेळी त्यांनी सांगितले कि, पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया हि अत्यंत साधी-सोपी-सुलभ, असून त्याचे अनेक लाभ आहेत. यामुळे लैंगिक सुखात कोणतीही बाधा उत्पन्न होता नाही. पूर्वीप्रमाणेच वीर्यपतन होते. त्यामध्ये फक्त शुक्रजंतू नसतात. त्यामुळे प्रत्येक विवाहित पुरुषाने अपत्य नको असल्यास स्त्रीस होणारी गर्भधारणा टाळण्यासाठी हा पर्याय स्विकारण्यास हरकत नाही.
‘माझ्याकडून प्रेरणा घेवून आणखी तीन जणांनी स्वतःची पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतली’ अशी माहिती सध्या पंचायत समिती कारंजा येथे कार्यरत आरोग्य विस्तार अधिकारी राजेंद्र मानके यांनी दिली.
‘मी स्वतः पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केली. म्हणून मी इतरांना त्याचे महत्व चांगल्या पद्धतीने पटवून देवू शकतो.’ अशी प्रतिक्रिया प्राथमिक आरोग्य केंद्र शेलूबाजारचे आरोग्य सहायक भारत यशवंत गोपनारायण यांनी दिली.
नसबंदी शस्त्रक्रियेचा इतिहास :-
25 जून 1977 रोजी तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने देशावर आणीबाणी लागू केली होती. याच दरम्यान संजय गांधींच्या पाच कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली.त्यातील एक मुद्दा सर्वात वादग्रस्त राहिला. तो म्हणजे लोकसंख्या नियंत्रणासाठी नसबंदी.त्यावेळी रुख्साना सुलताना या दिल्लीतील मुस्लीम भागात नसबंदी मोहिमेचा चेहरा बनल्या होत्या. त्यांनी त्यावेळी 13 हजार पुरुषांची नसबंदी ऑपरेशन केल्याचं सांगितलं जातं. पण आणीबाणीच्या काळात संजय गांधींच्या प्रचारामुळेच लोकांना ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ या मुद्द्याची जाणीव झाल्याचं सत्य नाकारत येत नाही.
लोकांवर जोरजबरदस्ती करून नसबंदी शस्त्रकीया हा कार्यक्रम यशस्वी होणार नाही असे शासनाच्या लक्षात आल्यानंतर ‘कुटुंब नियोजन’ कार्यक्रमाचे रुपांतर करून ‘कुटुंब कल्याण’ कार्यक्रम असे नामकरण करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये आवश्यक बदल करून शस्त्रक्रियेसोबत विविध कुटुंब नियोजनाची साधनांचादेखील यामध्ये वेळोवेळी समावेश करण्यात आला.
कुटुंब नियोजन पद्धती :- सध्यस्थितीत कुटुंब नियोजनाच्या पद्धतीचे दोन प्रकार आहेत A) कायमस्वरूपी कुटुंब नियोजनाच्या पद्धती B) तात्पुरत्या कुटुंब नियोजनाच्या पद्धती
A) कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धती :- यामध्ये कुटुंब नियोजनाच्या कायमस्वरूपी पद्धतींचा वापर करून लोकसंख्या नियंत्रणात आणणे आणि ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ हि संकल्पना आमलात आणणे हा उद्देश आहे.
यामध्ये शस्त्रक्रियेचे दोन प्रकार पडतात. त्यापैकी १) स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया २) पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया
१) स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया :- ही कायमस्वरूपी कुटुंब नियोजनाची पद्धत असून ही दोन पद्धतीने शस्त्रक्रिया केली जाते. त्यामध्ये I) टाका शस्त्रकीया II) बिनटाका शस्त्रक्रिया
I) टाका शस्त्रकीया :- यामध्ये स्त्रीच्या नाभीखाली ओटीपोटावर चार टाके पडतील एवढी उभी चीर देवून त्यातून हाताच्या बोटांच्या सहाय्याने गर्भाशयाची नलिका शोधून तिचा भाग बाहेर काढला जाते त्यातील एकावेळी एका नलिकेवर शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर दुसरी नलिका शोधून त्या नलिकेवर शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया तुलनेने जास्त काल चालणारी असते तसेच यामध्ये शस्त्रक्रियेसाठी मोठी चीर घेतल्याने झालेली जखम बरी होण्यास बराच कालावधी लागत असतो. त्यामुळे ज्या स्त्रीयांची ही शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना सात दिवस दवाखान्यात भरती व्हावे लागते. सिझेरियनमध्येच कुटुंब नियोजन शत्रक्रिया करावयाची झाल्यास ही शस्त्रक्रिया करणे सोयीचे होते. त्यामुळे पहिल्या अथवा दुसऱ्या सिझरमध्येच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला पात्र जोडप्यास दिला जातो. कोणत्याही कारणाने गर्भनलिकेला घातलेले टाके सुटल्यास शस्त्रक्रिया विफल होवून गर्भधारणा होण्याची शक्यता असते.
II) बिनटाका शस्त्रक्रिया :- यामध्ये स्त्रीच्या नाभीच्या अगदी जवळ खालील बाजूस एक टाका पडेल एवढी उभी चीर देवून त्यामध्ये लेप्रोस्कॉप (दुर्बीण) आत सोडली जाते. त्याच्या सहाय्याने गर्भाशयाची नलिका शोधून दुर्बीणद्वारे पकडली जाते. आणि ज्या पद्धतीने स्त्रिया आपल्या केसांच्या वेणीला रबर बँड बांधतात; अगदी त्याच पद्धतीने वेगळ्या पद्धतीचा दीर्घकाळ टिकणारा रबर बँड एका पाठोपाठ एक, दोन्ही गर्भनालिकांना बांधला जातो. ही शस्त्रक्रिया टाका शस्त्रक्रियेपेक्षा कमी वेळेत होणारी असल्याने व जास्त मोठी जखम नसणारी असल्याने याकरिता फक्त तीन दिवस रुग्णालयात भारती व्हावे लागते. कोणत्याही कारणाने गर्भनलिकेला घातलेले रबर बँड सुटल्यास शस्त्रक्रिया विफल होवून गर्भधारणा होण्याची शक्यता असते.
२) पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया :– यामध्ये पुरुषाच्या वृषणाला कोणतीही चिरफाड न करता गव्हाच्या दाण्याएवढी जखम केली आते. त्यामधून फक्त शुक्रजंतू वहन करणारी नलिका चिमटयाच्या सहाय्याने पकडून तिच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी केलेली जखम पुन्हा चिमटयाच्या सहाय्यानेचीमात्याच्य दाबून जखम बंद केली जाते. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा टाका घालण्याची आवश्यकता नसल्याने टाका न घालता जखम बंद केली जाते. ही शस्त्रक्रिया कोणत्याही स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेच्या तुलनेत अगदी साधी, सोपी व सुलभ असल्याने फारच थोड्या वेळात शस्त्रक्रिया पार पाडली जाते. शस्त्रक्रियेनंतर पुरुष लगेचच चालू शकतो. दुसऱ्या दिवशीपासून वृषणाला मोठा धक्का लागणार नाही अशी सर्व दैनंदिन कामे करू शकतो. यामध्ये या शस्त्रक्रियेनंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तीस लैंगिक संबंध अथवा तीन महिने शारीरिक संबंध ठेवताना निरोध वापरावा लागतो. कारण गर्भनलिकेच्या तुलनेत वीर्य नलिकेची लांबी मोठी असल्याने शस्त्रक्रियेपूर्वी तयार झालेल्या विर्यामधील शुक्रजंतू पूर्णपणे निघून जाईपर्यंत निरोध वापरेने गरजेचे असते. या कालावधीत निरोध न वापरल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर तीन महिन्यानंतर विर्यामध्ये शुक्रजंतू नसल्याची खात्री करून घेण्यासाठी सरकारी प्रयोगशाळेतून वीर्य तपासणी करून घ्यावी. कोणत्याही कारणाने शुक्रजंतू वहन करणाऱ्या नलिकेचे टाके सुटल्यास शस्त्रक्रिया विफल होवून गर्भधारणा होण्याची शक्यता असते.
B) तात्पुरत्या कुटुंब नियोजनाच्या पद्धती :- यामधील समाविष्ट पद्धतीनुसार तात्पुरत्या स्वरुपात पाळणा लांबविला जातो. त्यामध्ये १) तांबी २) गर्भनिरोधक गोळ्या ३) गर्भनिरोधक इंजेक्शन ४) निरोध
१) तांबी :- यामध्ये मुख्यत्वे दोन प्रकार पडतात
I) तांबी :- एका अपत्यानंतर ही तांबी बसवली जाते. यामध्ये ‘380-A’ या प्रकारची तांबी वापरली जाते. ही १० वर्ष टिकणारी तांबी असून याच्या माध्यमातून गर्भधारणा टाळली जाते. यामध्ये योनीमार्गातून गर्भाशय मुखातून तांबी आत सारली जाते. ही अशा रीतीने बसवली जाते, जेणेकरून शारीरिक संबंधानंतर वीर्यपतन झाल्यानंतर गर्भाशय मुखातून गर्भनलिकेकडे वाहत जाणारे शुक्रजंतू तांबीला गुंडाळलेल्या तांब्याच्या तारेच्या संपर्कात आल्यानंतर ते शुक्रजंतू मारले जातील.
II) PPIUCD :– यामध्ये बाळंतपणानंतर ४८ तासाच्या आत ही तांबी बसवली जाते. यामध्ये ‘CU-375’ या प्रकारची तांबी वापरली जाते. ही ५ वर्ष टिकणारी तांबी असून याच्या माध्यमातून गर्भधारणा टाळली जाते. नेहमी बसविण्यात येणाऱ्या तांबीप्रमाणेच ही तांबी बसविली जाते.
कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची तांबी गळून पडल्यास अथवा बसविलेल्या जागेवरून हलल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते.
२) गर्भनिरोधक गोळ्या :– यामध्ये मुख्यत्वे तीन प्रकार पडतात.
I) माला-N :- ही गोळी गर्भधारणा होवू नये म्हणून दररोज नियमित घ्यावी लागते. हि गोळी घ्यायची चुकल्यास गर्भधारणा राहू शकते. या गोळीचे सेवन दीर्घकाळ चालू राहिल्यास गर्भधारणा होण्यास अडथळा येवू शकतो.
II) छाया :- ही गोळी गर्भधारणा होवू नये म्हणून पहिले तीन महिने आठवस्यातून दोन वेळा घ्यावी लागते. त्यानंतर आठवड्यातून फक्त एकदा घ्यावी लागते. या गोळीचे सेवन दीर्घकाळ चालू राहिल्यास गर्भधारणा होण्यास अडथळा येवू शकतो.
III) EC पिल्स :- ही गोळी आपत्कालीन परिस्थितीत घेवू शकतो. कोणतेही गर्भनिरोधक साधन न वापरता शारीरिक संबंध आल्यास ७२ तासांच्या आत या गोळीचे सेवन करावे लागते. वारंवार या गोळीचे दीर्घकाळ सेवन केल्यास वंध्यत्वाचा धोका संभावू शकतो.
३) गर्भनिरोधक इंजेक्शन :- ‘अंतरा’ नावाचे इंजेक्शन गर्भधारणा होवू नये म्हणून दर तीन महिन्यातून एकदा इंजेक्शन घ्यावे लागते. गर्भधारणा व्हावी अशी इच्छा असल्यास हे इंजेक्शन बंद करावे लागते. हे इंजेक्शन सुरक्षित असून या इंजेक्शनमुळे कदाचित पाळीचा कालावधी थोडा वाढू शकतो; परंतु याव्यतिरिक्त याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
४) निरोध :- गुप्तरोग आणि नको असणारी गर्भधारणा टाळण्यासाठी अत्यंत परिणामकारक असणारे हे गर्भनिरोधक साधन आहे. पुरुष आणि स्त्री या दोघांसाठी निरोध बाजारात उपलब्ध आहेत. परंतु पुरुषांनी वापरावयाचे निरोध हे वापरण्यास सोपे असून ते सरकारी दवाखान्यात तसेच कोणत्याही मेडिकलमध्ये सहज उपलब्ध आहेत. कोणत्याही कारणाने लैंगिक संबंध ठेवताना निरोध फाटला तर मात्र गर्भधारणा राहू शकते. तसेच निरोध न वापरता शारीरिक संबंध ठेवल्यास कदाचित गुप्तरोग व एड्स सारख्या जीवघेण्या आजाराला बळी पडण्याची शक्यता असते.