माँझी सैनिकांनी वन विभागाच्या जागेवर मांडले ठाण

0
8

देवरी : श्री माँझी आंतरराष्ट्रीय समाजवाद आदिवासी किसान सैनिकांना भारतात कुठेही बैठक व कार्यक्रम घेण्याकरिता जागा उपलब्ध नाही. अनेकदा मागणी करूनही ती पूर्ण न झाल्याने त्यांनी आता प्रजासत्ताक दिनी वन विभागाच्या जागेवर ठाण मांडून वृक्षाखाली बैठकी घेणे सुरू केले.

यापूर्वी जागा मिळविण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, वनमंत्री, डीएफओ, वनपरिक्षेत्र अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आमदार आणि खासदार यांना निवेदन पत्र पाठवून एक जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र जागा उपलब्ध करून न दिल्याने शेवटी जिल्ह्यातील आदिवासी किसान सैनिकांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देवरीच्या एफडीसीएमच्या डेपोलगत असलेल्या जागेवर अतिक्रमण केले. तसेच आपल्या संस्थेचे फलक व भगवान शंकराची मूर्ती स्थापित करून वनविभागाची जागा बळकावली.

सविस्तर असे की, भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईत हजारोंच्या संख्येत आपल्या प्राणांची आहुती देणारे श्री माँझी आंतरराष्ट्रीय समाजवाद आदिवासी किसान सैनिकांना आपल्या संस्थेच्या बैठकी व इतर कार्यक्रम घेण्याकरिता देशात कुठेही जागा उपलब्ध नाही. सन १९५१ पासून हे सर्व सैनिक आपापल्याच घरी कार्यालयाचे फलक लावून संस्था चालवित आहेत. एवढेच नाही तर एखाद्या वेळी झाडाखाली बसून हे सैनिक आपल्या बैठका घेतात.

जिल्ह्यात या संस्थेचे १५ हजार सैनिक सदस्य आहेत. त्यांनी २५ फेब्रुवारी २०१५ पासून प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, वनमंत्री, डीएफओ, वनपरिक्षेत्र अधिकारी, एसडीओ, तहसीलदार, आमदार आणि खासदारांना निवेदनपत्र देवून एका ठिकाणी तरी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. याविषयी २६ आॅक्टोबर २०१५ रोजी देवरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनाही निवेदन देऊन सदर जागेचा सातबारा, नकाशा आणि आखीव प्रमाणपत्र दिले होते. या जागेवर दोन-तीन दिवसांपूर्वी ट्रॅक्टरद्वारे जागेचे सपाटीकरण करून वृक्ष लागवडीकरिता खोदकाम सुरू केले.

ही बाब आदिवासी किसान सैनिकांना समजताच त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या एका दिवसापूर्वी देवरी येथील परसटोलाच्या संस्था कार्यालयातून शेकडो आदिवासी सैनिकांनी एक रॅली काढून देवरीच्या तहसील कार्यालयासमोरील एफडीसीएमच्या डेपोलगत जागेवर भगवान शंकराची मूर्ती स्थापित केली. तसेच आपल्या संस्था कार्यालयाचे फलक लावून सदर जागेवर अतिक्रमण केले आहे.

सदर रॅली काढून जागेवर अतिक्रमण करणाऱ्या या आदिवासी किसान सैनिकांचे नेतृत्व भागी येथील सामाजिक कार्यकर्त्या शालू पंधरे आणि संस्थेचे जिल्हा सचिव तिजूराम टेकाम, जिल्हा कोषाध्यक्ष ज्ञानीराम कुंजाम यांनी केले. या वेळी देवरी तालुका अध्यक्ष शालिकराम पंधरे, तालुका सचिव सेवकराम उईके, देवरी क्षेत्र अध्यक्ष सदाराम टेकाम, कोषाध्यक्ष लक्ष्मण उईके, शाखा अध्यक्ष आसाराम पंधरे, उपक्षेत्र अध्यक्ष धनिराम जिंदाकूर, भर्रेगाव पंचायत सचिव जयराम पुराम, आमगाव तालुका अध्यक्ष मदनलाल उईके, रामचंद्र भलावी, सिरपूर क्षेत्र अध्यक्ष जगन्नाथ गोटे, लोहारा पंचायत सचिव मधूकर मडावी, मुंडीपार पंचायत अध्यक्ष मोतीराम कुराम, छन्नू पुराम, चाळीस गावपंचायत क्षेत्र अध्यक्ष तुळसीदास कुरसुंगे, उपाध्यक्ष भरत मसराम, सालेकसा क्षेत्र सचिव प्रेमलाल इळपाते, देवरी शाखा उपकोषाध्यक्ष सुरजलाल पंधरे, सडक-अर्जुनी अध्यक्ष रामजी इळपाते, कचरूलाल टेकाम, खडकी-बाह्मणी अध्यक्ष सोहनलाल परतेकी, बिसगाव पंचायत क्षेत्र उपाध्यक्ष धनीराम मडावी आणि बहुसंख्य आदिवासी किसान सैनिक पदाधिकारी व सदस्य महिला पुरुष प्रामुख्याने उपस्थित होते.