थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज

0
7

 शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे संपूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे असे होते. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतला दत्तक घेतले. त्याचे “शाहू” असे नामकरण करण्यात आले. शाहू महाराज लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे आणि न्यायप्रिय होते.

         इ. स. 1889 ते 1893 या काळात शाहू महाराजांनी आपले शिक्षण पूर्ण केले. 1 एप्रिल 1891 साली ते लक्ष्मीबाई खानविलकर यांच्याशी विवाहबद्ध झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1894 साली त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. संस्थानातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत दिले. स्त्री शिक्षणासाठी देखील ते नेहमी आग्रही होते. जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवणे बंद केले.

         1896 साली पडलेला दुष्काळ आणि त्यानंतर आलेली प्लेगची साथ, तशा संकटसमयी शाहू महाराजांनी दुष्काळी कामे, स्वस्त धान्य दुकाने, निराधार आश्रमाची स्थापना केली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणासाठी आणि मूकनायक वृत्तपत्रासाठी सहकार्य केले. शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ची स्थापना, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, राधानगरी धरणाची उभारणी, अशा समाजोपयोगी कामातून शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम राबवले. अशा सर्व कामांतून त्यांचा कृषी विकासातील दृष्टिकोन दिसून येतो.

          शाहू महाराजांना ‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. त्यांनी आपल्या जीवनकार्यात समाजातील सर्व घटकांना समाविष्ट करून घेतले. आपल्या अधिकारांचा फायदा बहुजन समाजाला मिळवून दिला. त्यांच्या न्यायासाठी आणि शिक्षणासाठी ते नेहमी झटले. त्यांच्या सर्वाभिमुख विकासाच्या दृष्टिकोनामुळे इतिहासकारांनी त्यांची नोंद लोककल्याणकारी राज्यकर्ता म्हणून केली आहे. 6 मे 1922 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी शिक्षण, कृषी, उद्योग, कला, क्रीडा व आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आणि चालना दिली. अशा या राजर्षी व्यक्तिमत्त्वास मानाचे अभिवादन !

           सामाजिक न्यायाच्या शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे, रमाई आवास योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, सफाई कामगारांच्या मुला-मुलींसाठी पब्लिक स्कूल, कन्यादान योजना, अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे, अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींसाठी निवासी शाळा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आदी योजनांचा यात समावेश आहे. सदर योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपले जीवनमान उंचवावे.

– कैलाश गजभिये

 ‘उपसंपादक’

 जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया