देशाच्या कृषी विकासाचा पाया रचणारे पहिले कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख

0
57

अकोला : देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांची आज 126 वी जयंती. आज आपल्या देशाच्या कृषी क्षेत्रातील भरारीचा भक्कम पाया पंजाबराव देशमुख यांच्या कृषी धोरण आणि विचारांमुळे घातला गेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय शेती आणि कृषी क्षेत्राला नवा आकार देणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान राहिलं. त्यातूनच राज्यातील एक अग्रगण्य समजल्या अमरावती येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचा पाया त्यांनी घातला. देशाच्या आणि राज्याच्या कृषी आणि शिक्षण क्षेत्राला नवी ओळख देणाऱ्या या नेत्यांचं कार्य राज्याच्या विकासासाठी महत्वाचं ठरलं आहे.

देशाच्या सध्याच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीत देशाचे प्रथम कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा सिंहाचा वाटा आणि मोलाचे स्थान आहे. शेती आणि मातीशी असलेले घट्ट नाते आणि या क्षेत्राचा सूक्ष्म अभ्यास. हीच गोष्ट लक्षात घेत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख यांची निवड केली. 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती जिल्ह्यातील सध्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या पापळ या गावी डॉ. पंजाराव देशमुख यांचा जन्म झाला. वडील शामराव देशमुख हे हाडाचे शेतकरी. त्यामुळेच बालपणापासून पंजाबरावांना शेतीविषयी विशेष प्रेम.

उच्च शिक्षीत नेता :
प्राथमिक शिक्षण गावात घेतल्यानंतर ते पुढे माध्यमिक शिक्षणसाठी कारंजा लाड आणि अमरावतीत येथे गेले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्याच्या ‘फर्ग्युसन कॉलेज’ येथून पूर्ण केलं. पुढे 1921 मध्ये इंग्लंडच्या जगप्रसिद्ध कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी ‘बॅरिस्टर पदवी’ मिळवली. तेथेच त्यांनी संस्कृतमध्ये एम.ए. आणि पी.एच.डी.ची पदवी घेतली. ‘Origin and development of religion in vedic literature’ हा विषय घेऊन त्यांनी पीएचडी मिळवली. पण शिक्षणासोबतच त्यांना देशातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचा कळवळा होताच. त्यातूनच त्यांनी आपले पुढचे जीवन देशातील जनतेला समर्पित करण्याचा निर्णय घेतला.

अस्पृश्यता निवारणाचं कार्य :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्पृश्य निवारण चळवळीत पंजाबराव देशमुख यांनी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लववून काम केलं. यातूनच अमरावतीच्या ‘आंबा मंदिरा’त दलितांना प्रवेश मिळविण्यासाठी त्यांनी सत्याग्रहही केला. त्यांच्या आंदोलनामुळेच हे मंदिर दलितांसाठी खुलेही झाले. पण, हे करताना त्यांना समाजातील प्रस्थापितांचा मोठा विरोध सहन करावा लागला. पुढे भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या संविधान सभेचे सदस्य म्हणून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम केलं.

पंजाबराव देशमुखांचा राजकीय प्रवास :
पंजाबराव देशमुख तीन वेळा लोकसभेवर निवडून आले होते. देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून त्यांनी अनेक दूरगामी निर्णय घेतले. आज अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्या भारताची ओळख त्यांच्या त्यावेळच्या निर्णयामुळे पूर्णत्वास आली. 1955 मध्ये त्यांनी ‘भारत कृषक समाजा’ची स्थापना केली. पुढे शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास आलेल्या अमरावती येथील ‘श्री. शिवाजी शिक्षण संस्थे’चा पाया त्यांनी घातला. या संस्थेने विदर्भातील गरीब आणि बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. त्यांच्या कामाचा तेव्हाच्या अनेक जागतिक नेत्यांनी गौरवही केला.

10 एप्रिल 1965 रोजी पंजाबराव देशमुख यांचं निधन झालं. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुढे महाराष्ट्र सरकारने 20 ऑक्टोबर 1989 रोजी त्यांच्या नावानं अकोला येथे ‘डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना केली. कृषी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर त्यांचे जवळचे सहकारी पी.पी.देशमुख हे विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल झाले. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे विचार, व्यक्तिमत्व, ‘व्हिजन’ अगदी जवळून पाहणारे पी.पी.देशमुख यांच्याकडे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या असंख्य आठवणी आहेत.

स्मृती संग्रहालय :
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘डॉ. पंजाबराव देशमुख’ यांचे समग्र जीवनपट आणि कार्य उलगडून दाखविणारे स्मृतीकेंद्र विद्यापीठाने 10 मे 2003 रोजी उभारले. यामध्ये भाऊसाहेबांच्या वस्तू, त्यांचे कार्य, दुर्मिळ फोटोज आणि इतर महत्वाच्या गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. या स्मृतीकेंद्रात एकूण चार मुख्य दालनांचा समावेश.
यातील पहिले दालन पूर्णतः भाऊसाहेबांना समर्पित आहे. त्यांची दुर्मिळ छायाचित्रे, त्यांनी वापरलेल्या खाजगी वस्तू आणि इतर साहित्य या दालनामध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये त्यांचे कपडे, झोपण्याची खाट, त्यांच्या आयुष्यातील महत्वाची छायाचित्रे यांचा समावेश आहे.

दोन दालनांमध्ये कायमस्वरूपी कृषी प्रदर्शनीचे आयोजन, यामध्ये विद्यापीठाचे संशोधन आणि विविध उपलब्धी याबाबत विस्तृत माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. तर चौथ्या दालनाचे सभागृहात रुपांतर करण्यात आले असून त्याची आसनक्षमता 100 एवढी आहे. मान्यवर आणि अभ्यागतांच्या बैठकीसाठी येथे एक स्वतंत्र्य कक्ष आहे. ज्याची क्षमता 40 जणांची आहे. या स्मृती केंद्राची उभारणी सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या ऐच्छिक आणि उत्स्फूर्त सहभागातून आणि देणगीतून करण्यात आली आहे.

आतापर्यंत अनेक मान्यवरांनी या स्मृती केंद्राला भेट दिली आहे. ज्यात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम, माजी राज्यपाल के. शंकरनारायण, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबतच राज्य आणि देशातील अनेक मोठ्या विद्यापीठांच्या कुलगुरु आणि परदेशी पाहुण्यांचा समावेश आहे.

कृषी आणि शिक्षण क्षेत्रात भरघोस कार्य करणाऱ्या आणि आपल्या डॉ.पंजाबराव देशमुख यांना त्यांच्या कामाच्या योग्य सन्मान देण्यात शासन आणि समाज कमी पडल्याचं खंत त्यांना मानणाऱ्यांना आणि अभ्यासकांना वाटते. पण, असं असलं तरी, आजही कृषीक्षेत्रातील समस्यांची उत्तरे ‘डॉ. पंजाबराव देशमुख’ यांच्या चिरतरुण विचारांमध्ये दडलेले आहेत हे तेवढेच सत्य आहे. त्यामुळं पंजाबराव देशमुख यांना भारतरत्नचा सन्मान मिळावी अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. असं घडलं, तर त्यांच्या कार्याचा आणि त्यांचा विचारांचा योग्य सन्मान होईल असं त्यांना वाटतं.